
उद्योजकांसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन
पुणे, ता. ६ : मुक्तछंद, घे भरारी आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या वतीने उद्योजकांसाठी मोफत कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योगांसाठी आवश्यक असलेले ‘उद्यम आधार कार्ड’ प्रत्येक सहभागी उद्योजकाला मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. याचे आयोजन माजी आमदार व भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले आहे, अशी माहिती आयोजकांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी डॉ. मेधा कुलकर्णी, अनिता तलाठी, घे भरारीचे राहुल कुलकर्णी, नीलम एदलाबादकर आणि दे आसरा फाउंडेशनच्या नम्रता कामतकर आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘ही कार्यशाळा येत्या शनिवारी (ता. ११) कर्वेनगर येथील पंडित फार्म्स येथे सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन या वेळेत पार पडणार आहे. त्याच ठिकाणी शनिवारी (ता. ११) आणि रविवारी (ता. १२) मुक्तछंदतर्फे पुणे शॉपिंग फेस्टिव्हल, ‘धागा’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी ‘एमएसएमई’च्या विविध योजनांविषयी उद्योजकांना केंद्रीय मंत्री राणे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ‘मानसिकता व्यवसायवृद्धीची,’ ‘कर्जसाहाय्यासाठीची पूर्वतयारी,’ ‘उद्योजकांसाठी बँकेच्या योजना,’ ‘व्यवसायासाठी सोशल मीडियाचा वापर’ या विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.