
शहर, जिल्ह्यातील रेशन दुकाने आजपासून तीन दिवस बंद
पुणे, ता. ६ ः स्वस्त धान्य दुकानदारांची रेशन दुकाने कमिशनची थकबाकी त्वरित मिळावी, पॉस मशिनमधील गोंधळ थांबवावा, नियमितपणे धान्याचा पुरवठा करण्यात यावा, या मागण्यांसाठी स्वस्त धान्य दुकानदारांनी सलग तीन दिवस दुकान बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार येत्या मंगळवारपासून (ता. ७) पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व स्वस्त धान्य दुकाने सलग तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून आता मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हेच धान्य प्रतिकिलो दोन रुपये किलो दराने दिले जात असे. यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना प्रतिक्विंटल १५० रुपये कमिशन देण्याची घोषणा सरकारने केली होती. परंतु, या कमिशनपोटी मिळणारी रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्यातच आता हेच धान्य मोफत देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. त्यामुळे कमिशनची थकबाकीही नाही आणि आता नव्या निर्णयानुसार स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशनचे काय होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे रेशन धान्य दुकानदार अक्षरशः रस्त्यावर येणार आहेत. त्यामुळे सरकारचे मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे दुकान बंद आंदोलन करण्यात येत असल्याचे रेशन धान्य दुकानदार संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष गणेश डांगी यांनी सांगितले. पुणे शहर व जिल्ह्यात एकूण दोन हजार पाचशे रेशन दुकाने कार्यरत आहेत. यापैकी पुणे शहरात ७०० आणि पिंपरी-चिंचवड व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एक हजार आठशेच्या आसपास ही दुकाने आहेत.