
माध्यम प्रमाणीकरण, संनियंत्रण समिती स्थापन
पुणे, ता. ७ : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) स्थापन करण्यात आली आहे.
या समितीमध्ये सदस्य म्हणून कसबा पेठ व चिंचवडचे निवडणूक निर्णय अधिकारी, पत्रकार अनिल सावळे, उपसंचालक (माहिती) डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक महेश अय्यंगार, पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे हे समितीचे सदस्य सचिव आहेत. या समितीचे कामकाज जिल्हा माहिती कार्यालय, तळमजला, नवीन मध्यवर्ती इमारत (दूरध्वनी ०२०- २६१२१३०७) येथे सुरु झाले आहे.
निवडणूक आचारसंहिता कालावधीत राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून प्रचारासाठी दिलेल्या समाजमाध्यम, दूरचित्रवाणी वाहिन्या, आकाशवाणी, स्थानिक केबल वाहिन्यांवरील जाहिराती संहितेनुसार असल्याबाबत लक्ष ठेवण्यात येते. निवडणूक प्रचारासाठी जाहिरातींचे प्रमाणीकरण करण्याचे कामही समिती करते. मतदानाचा दिवस आणि त्यापूर्वीचा एक दिवस वर्तमानपत्रातील जाहिराती या समितीकडून प्रमाणित करून घेणे उमेदवारांसाठी आवश्यक आहे. एसएमएस, वृत्तपत्राच्या ई-आवृत्त्या, विविध न्यूज पोर्टल आदी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवरील निवडणूक विषयक जाहिरातींचे निरीक्षणही समितीच्या कार्यकक्षेत येते.
पेड न्यूज तपासून कार्यवाही
समिती पेड न्यूज प्रकरणे तपासून उचित कार्यवाही करते. जिल्हास्तरीय समितीकडे निवडणूक जाहिरातीच्या प्रमाणीकरणासाठीचे अर्ज स्वीकारले जातील. समितीमार्फत जाहिरातीची तपासणी होऊन संबंधितास प्रमाणपत्र देण्यात येते. प्रमाणीकरणानंतर जाहिराती इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित करता येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
-----