
औंध परिसरातील घटना; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण
पुणे, ता. ७ ः औंधमधील स्पायसर कॉलेज परिसरातील रस्त्याच्याकडेला बेकायदेशीरपणे दुकाने थाटणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकारी व कर्मचारी गेले होते. त्यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना जमावाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला. या घटनेनंतरही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ९० टक्के अतिक्रमणे काढण्याची कारवाई केली. दरम्यान, याप्रकरणी जमावाविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहराच्या वेगवेगळ्या भागातील अतिक्रमणांवर मागील काही दिवसांपासून कारवाई केली जात आहे. औंध येथील स्पायसर कॉलेज परिसरातील रस्त्याच्याकडेला बेकायदेशीरपणे उभारलेल्या दुकानांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक मंगळवारी सकाळी या परिसरात दाखल झाले होते. त्यावेळी तेथील दुकानदारांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून पथकावर दगडफेक केली. तसेच जेसीबी चालक व दोन अभियंत्यांना मारहाण केली. या घटनेनंतरही अतिक्रमण विभागाच्या पथकाने कारवाई सुरूच ठेवली. पथकाने ५० ते ६० हजार फुटांचे बांधकाम पाडून ९० टक्के कारवाई केली. दरम्यान, याप्रकरणी महापालिकेच्यावतीने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिक्रमण विभागाचे आयुक्त माधव जगताप यांनीही या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन, यापुढेही अतिक्रमण कारवाई अधिक कडक करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. महापालिकेच्या पथकावर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली.
औंध येथे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकावर जमावाने हल्ला केला. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतरही अतिक्रमण विरोधी कारवाई कडक केली जाणार आहे.
- विक्रम कुमार, महापालिका आयुक्त.