
सिंहगड रस्ता परिसरात दहशत माजविणाऱ्या टोळीवर मोका
पुणे, ता. ७ : सिंहगड रस्ता भागात नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगार विनोद जामदारे याच्यासह टोळीतील तिघांविरोधात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोका) कारवाई केली. या गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबत आदेश दिले होते.
विनोद जामदारे (वय ३२, रा. सर्वोदय लॉन, वडगाव, मूळ रा. लोणारवाडी, जि. उस्मानाबाद), आकाश गाडे (वय २१, रा. रामनगर, माणिकबाग, सिंहगड रस्ता), गणेश म्हसकर (वय २३, रा. कुमार अपार्टमेंट, माणिकबाग, सिंहगड रस्ता, मूळ रा. आंबी, ता. पानशेत) अशी मोका कारवाई केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. हे तिघेही पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. गतवर्षी १६ नोव्हेंबर रोजी आरोपी जामदारे याने एका तरुणावर हत्याराने वार करून गंभीर जखमी केले होते. तसेच, सिंहगड रस्ता भागातील वडगाव, धायरी, हिंगणे, माणिकबाग, दत्तवाडी, वारजे आणि हवेली परिसरात गुन्हे केले आहेत. या संदर्भात सिंहगड रस्ता पोलिसांनी जामदारे आणि साथीदारांविरुद्ध मोका कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला होता. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून शहरातील दहा गुन्हेगारी टोळ्यांविरोधात मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.