
छाननीत ११ अर्ज अवैध
पुणे, ता. ८ : कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत २९ उमेदवारांनी दाखल झालेल्या अर्जांपैकी आठ उमेदवारांचे ११ अर्ज छाननी प्रक्रियेत बुधवारी अवैध ठरले. त्यामुळे कॉंग्रेस-भाजपसह २१ उमेदवारांचे २८ नामनिर्देश अर्ज वैध ठरले आहेत. आता १० फेब्रुवारी या दिवशी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत या मतदार संघातून २९ उमेदवारांनी ३९ नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. परंतु, दुरुस्त प्रतिज्ञापत्र मुदतीत सादर न केल्याने तसेच पक्षाचा एबी अर्ज नसल्याने, नामनिर्देशन पत्रात पुरेशा सूचकांची स्वाक्षरी नसल्याने, अर्जावर स्वाक्षरी नसल्याने ११ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे यांनी दिली. काँग्रेस पक्षातर्फे एबी अर्ज नसल्याने बाळासाहेब दाभेकर यांचा पक्षाकडून भरलेला उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. मात्र, दाभेकर यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला दुसरा अर्ज वैध ठरला आहे. तर भाजपचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांचे चारही अर्ज वैध ठरल्याने पक्षाकडून डमी अर्ज दाखल केलेल्या गणेश बीडकर यांचा अर्ज मात्र अवैध ठरला आहे. तरी हिंदू महासंघातर्फे आनंद दवे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला असून हा अर्ज वैध ठरला आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांना लागलेले बंडखोरीचे ग्रहण सुटणार किंवा नाही, याबाबतचे चित्र शुक्रवारी अर्ज माघारीच्या मुदतीनंतर स्पष्ट होणार आहे.