महापालिकेची प्रयोगशाळा 
रुग्णांसाठी वरदान!

महापालिकेची प्रयोगशाळा रुग्णांसाठी वरदान!

Published on

पुणे, ता. ९ ः ‘‘प्रचंड अशक्तपणा व घाबरल्या सारखे होत असल्याने मी डॉक्टरांकडे गेले. त्यावेळी त्यांनी ईसीजी, बी१२, छातीचा एक्सरे, सोनोग्राफी, बीएसएल यासह इतर चाचण्या डॉक्टरांनी सांगितल्या. खासगी प्रयोगशाळेत याचा खर्च ११ हजार रुपये सांगितल्याने खर्च मला धक्काच बसला. पुणे महापालिकेच्या जयाबाई सुतार रुग्णालयात कमी पैशात सर्व चाचण्या केल्या जातात अशी माहिती मिळाली. तेथे गेल्यानंतर या सर्व चाचण्या पाच हजार ३०० रुपयांत झाल्या. कमी वेळेत आणि स्वच्छ, चांगल्या वातावरणात महापालिकेच्या दवाखान्यात या चाचण्या झाल्याने हा अनुभव सुखद करणारा होता,’’ असे सोनाली पाटील सांगत होत्या. अशाप्रकारे आत्तापर्यंत ३७ लाख ६६ हजार चाचण्या झाल्या आहेत.

कसे झाले शक्य?
- डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेल्यानंतर आजाराचे योग्य निदान करण्यासाठी ते आधी वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करण्यासाठी सांगतात.
- खासगी प्रयोगशाळेत या चाचण्यांसाठी गेल्यानंतर मोठा खर्च येतो, अनेक नागरिकांना हा खर्च परवडणाराही नसतो.
- त्यामुळे ते शहरात कुठे स्वस्त चाचण्या होतात का? याचा शोध घेतात.
- काही अपवादात्मक प्रयोगशाळा सोडल्यास बहुतांश ठिकाणचे दर हे थोड्याफार प्रमाणात सारखेच आहेत.
- पुणे महापालिकेतर्फे गाडीखाना येथे प्रयोगशाळा अद्ययावत नसल्याने अतिशय मोजक्या चाचण्या केल्या जात होत्या.
- महापालिकेने नागरिकांची ही अडचण ओळखी क्रस्ना डायग्नॉस्टिक सोबत खासगी भागिदारीतून (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप-पीपीपी) तत्त्वावर करार केला.
- महापालिकेने या संस्थेला मोफत जागा दिली आहे. त्या बदल्यात या संस्थेकडून केंद्र सरकार आरोग्य योजनेच्या (सीजीएसएच) दरापेक्षा सहा टक्के कमी दराने नागरिकांना बायोकेमेस्ट्री, पॅथॉलॉजी, हिस्टॉलॉजी या तपासण्या केल्या जात आहेत.

या ठिकाणी आहे प्रयोग शाळा
मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय आणि कोथरूड येथील सुतार रुग्णालयात या प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. येते रक्त, लघवी, सर्व प्रकारच्या सोनोग्राफी, एमआरआय, सिटीस्कॅन, टुडीइको, मॅमोग्राफी यासह ३९५ प्रकारच्या चाचण्या होतात. यासाठी या संबंधित संस्थेकडे तंत्रकुशल कर्मचारी, डॉक्टर असल्याने आजाराचे योग्य निदान होते.

४५ ठिकाणी सॅम्पल कलेक्शन
पुणे महापालिकेचे प्रसूतिगृह व सर्व दवाखाने अशा ४५ ठिकाणी रक्त, लघवीचे सॅम्पल कलेक्शन करण्याची सुविधा आहे. त्यामुळे नागरिकांना यासाठी कमला नेहरू किंवा सुतार रुग्णालयात जाण्याची वेळ पडत नाही.

महापालिकेने पीपीपी तत्त्वावर दोन ठिकाणी प्रयोगशाळा उभ्या केल्या आहेत. यामध्ये सर्व अत्याधुनिक यंत्रसामग्री असून, आजाराचे बिनचूक निदान केले जाते. २०१८ पासून ही सेवा सुरू असून ३५ लाखापेक्षा जास्त चाचण्या येथे झालेल्या आहेत. खासगी प्रयोगशाळांपेक्षा इथले दर खूप कमी असून, सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा होत आहे.
- डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख, महापालिका

डॉक्टरांनी सिटीस्कॅन करण्यास सांगितले होते. खासगी प्रयोगशाळेत ७५०० रुपये खर्च सांगितला होता. पण महापालिकेच्या प्रयोगशाळेत अडीच हजार रुपयेच खर्च आला.
- संदीप जोशी, नागरिक

काही चाचण्यांचे तुलनात्मक दरपत्रक
चाचणी - खासगी प्रयोगशाळा -महापालिका प्रयोगशाळा
संपूर्ण ब्लड काऊंट - ३५० - १४६

लिव्हर फंक्शन टेस्ट - ९६० - २४३
लिपीड प्रोफाइल - ६०० -२४३
बी १२ - ७५० - २४३
सीटी स्कॅन - ४५०० -९७३
एमआरआय - ७५०० - २५५०
चेस्ट एक्सरे - ४०० - ६६

महापालिकेच्या इतर सुविधा
- कै. शंकरराव पोटे रुग्णालयात एमआरआय, डिजिटल एक्सरे, सोनोग्राफी सुविधा सीजीएसस दरापेक्षा आठ टक्के कमी दराने मिळतात.

२०१८ ते २०२२ या कालावधीत झालेल्या चाचण्या
रक्त लघवी चाचण्या - ३५,००,०००
सिटीस्कॅन - २८०००
एमआरआय - ३८०००
एक्स रे - २,००,०००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.