
विविध उपक्रमातून कुष्ठरोग जनजागृती
पुणे : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात ‘स्पर्श जनजागृती अभियान २०२३’ मोहीम राबविण्यात येत आहे. रांगोळी स्पर्धा, प्रभात फेरी, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजूषा अशा विविध उपक्रमातून कुष्ठरोगाबाबत जनजागृती करण्यात आली, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याचे सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. एच. ए. पाटोळे यांनी दिली. राज्यात ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या दरम्यान कुष्ठरोगाबद्दल शास्त्रीय माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. कुष्ठरोगाबद्दलचे समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रभात फेरी, महिला मंडळ सभा, प्रदर्शन, आरोग्य मेळावे असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. समाजाच्या प्रचलित मानसिकतेप्रमाणे कुष्ठरोग हा पूर्वजन्मीच्या पापामुळे, दैवी शापामुळे होणारा रोग असल्याचे समजले जाते. असे गैरसमज दूर करून कुष्ठरोगाची शास्त्रीय माहिती नागरिकांपर्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने पोचावी, हा या उपक्रमामागचा प्रमुख उद्देश आहे, असेही डॉ. पाटोळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले.