
एका वाक्याने केला घोळ वाढदिवशी संशयकल्लोळ! वाढदिवशी संशयकल्लोळ एका वाक्याने झाला घोळ!
‘‘अहो, उद्या काय आहे, सांगा बघू.’’ मंजूषाने अमरला विचारले.
‘‘अगं उद्या शनिवार आहे. एवढंही तुला माहिती नसावं म्हणजे अति झालं.’’ मोबाईलमधून डोकं वर न काढता चिडून अमरने उत्तर दिले.
‘‘तेवढं मला कळतं. उद्या काय विशेष आहे, हे सांगा.’’ मंजूषाने पुन्हा विचारले.
‘‘हे बघ, कामाच्या गडबडीत मला कोडी घालत जाऊ नकोस. काय आहे ते सांग.’’ अमरने म्हटले.
‘‘अहो, उद्या तुमचा वाढदिवस आहे. तुम्हाला काय गिफ्ट देऊ सांगा.’’ मंजूषाने विचारले.
‘‘अगं काही नको. माझ्याशी प्रेमाने बोलत जा. मला शांतपणे जगू दे. त्रास होईल, असं वागत जाऊ नकोस.’’ अमरने म्हटले.
‘‘नको बाई. ते मला नाही जमायचं. गिफ्टच देते. तेच मला परवडेल.’’ मंजूषाने हसत म्हटले.
‘‘बरं उद्याचा एक दिवस तरी माझ्याशी प्रेमाने बोल. अजिबात भांडू नकोस.’’ अमरने असं म्हटल्यावर मंजूषा विचारत पडली. ‘आपल्याला हे जमेल का?’ असा तिने स्वतःलाच प्रश्न विचारला.
‘‘ठीक आहे. आपण उद्या सकाळी शॉपिंगला जाऊ. वाढदिवसानिमित्त मला तुमच्यासाठी बरंच काही खरेदी करायचंय.’’ मंजूषाने असं म्हटल्यावर अमर तयार झाला. दुसऱ्या दिवशी दोघेही मॉलमध्ये गेले. मंजूषाने चार साड्या, तीन ड्रेस, चपलांचे दोन जोड खरेदी केले.
‘‘अहो, हा मॉल महिलांसाठी आहे. त्यामुळे तुमच्यासाठी येथे चांगले कपडे नाहीत पण पुढच्या आठवड्यात पुरुषांसाठी नवीन स्टॉक येणार आहे, असं मॅनेजरने सांगितलंय. आपण तुमच्यासाठी परत येऊ.’’ मंजूषाने म्हटले.
‘‘अगं काही नको. वाढदिवसानिमित्त आज काहीतरी घेऊ.’’ अमरने म्हटले. त्यानंतर तिने अमरसाठी दोन रुमाल, सॉक्सची जोडी व एक टीशर्ट घेतला.
‘‘वाढदिवस असला म्हणून काय झालं? फार उधळपट्टी करण्यात अर्थ नाही.’’ मंजुषाने म्हटले. संध्याकाळी वाढदिवसाची जोरात तयारी केली. मंजुषाने आकर्षक नवीन साडी नेसली. छानसा मेकअप केला. गेल्या आठवड्यात केलेले दागिनेही घातले. अमरने नवीन टीशर्ट घातला. थोड्यावेळाने नातेवाईक व शेजारची मंडळी आली. अनेकांनी अमरला शुभेच्छा दिल्या.
‘‘अमरराव, वाढदिवसाच्या शुभेच्छा. हा टीशर्ट तुम्हाला फारच खुलून दिसतोय. तुम्ही कॉलेजमधील तरुणांनाही फिके पाडाल.’’ शेजारच्या मानसीवहिनींनी सुहास्य वदनाने म्हटले. थोड्यावेळाने अमरने केक कापला. मंजुषाने पावभाजीचा बेत केला होता. रात्री दहापर्यंत सगळेजण जेवण करून घरी गेले. त्यानंतर मंजुषाची चुळबूळ वाढली.
‘‘अहो, किती वाजले?’’ असं ती दर पंधरा मिनिटांनी विचारू लागली. साडेअकराला अमरला झोप येऊ लागली, तशी ती त्याला गोड बोलून गप्पांमध्ये गुंतवू लागली. अमरला यातील गौडबंगाल काही कळेना. थोड्यावेळाने तिने विचारले, ‘‘काय हो आता बारा वाजले ना?’’ अमरने होकार दिल्यानंतर ती म्हणाली, ‘‘म्हणजे तुमच्या वाढदिवसाचा दिवस संपला ना? दुसरा दिवस चालू झाला ना?’’ यालाही अमरने होकार दिला. त्यावर मात्र, तिने रणचंडिकेचा अवतार धारण केला. ‘वाढदिवशी माझ्याशी प्रेमाने बोल, माझ्याशी भांडू नको,’ असा शब्द दिल्याने मी शांत होते. पण आता दिवस बदलला आहे. मी एवढी भारीतील साडी नेसली होते. दागिने घातले होते.
मस्त मेकअप केला होता आणि तुम्ही फक्त टीशर्ट घातला होता. तरीही शेजारच्या मानसीने माझ्याकडे ढुंकूनही न पाहता, ‘अमरराव, तुम्हाला टीशर्ट खुलून दिसतोय. कॉलेजमधील मुलांनाही फिके पाडाल,’ असं हसून का म्हणाली? यामागचं खरं कारण सांगा. नाहीतर तुमची काही खैर नाही.’’ मानसीने रागाने म्हटलं.
‘‘अगं मानसीवहिनी सहज म्हणाल्या....सहज म्हणाल्या...सहज म्हणाल्या.....’’ अमर रात्रभर खुलासा करत राहिला.