
वारज्यात खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा
पुणे, ता. ९ : पिंपरी येथील कंपनीतून आलेला काचेचा माल वारजे येथे उतरवताना माथाडीच्या नावाखाली खंडणीच्या स्वरूपात अतिरिक्त पैशाची मागणी करून ती न दिल्यास मारहाण करण्याची धमकी देणाऱ्या एकावर वारजे पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश दिली अडगळे (वय ३२, रा. म्हाडा कॉलनी, वारजे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत मंगला राम मोहन लाल (रा. न्यू अहिरे गाव, ता. हवेली) यांनी वारजे पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगला यांनी पिंपरी येथील संतोष ग्लास या कंपनीतून काचेचा माल मागविला होता. काचेचा माल घेऊन ते वारजे येथील म्हाडा कॉलनी मुठा बिल्डिंग येथे आले असता संशयित आरोपी अविनाश अडगळे तेथे आला. कंपनीचे काम कामगार माल खाली करत असताना त्याने त्यांची अडवणूक केली. तसेच माल खाली करण्याची थांबवून माल खाली करण्यास प्रत्येक पेटीस १३७ रुपये तर एकूण सर्व एक हजार २३३ रुपये होत असताना आरोपीने त्यांना आठ हजारांची मागणी केली. जर रक्कम दिली नाही तर कामगारांना मारहाण करण्याची धमकी दिली.