
चिंचवडमध्ये ५१०, कसब्यात २७० मतदान केंद्रे
पुणे, ता. ९ ः चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने चिंचवडमधील ५१० आणि कसब्यातील २७० मतदान केंद्रांना मान्यता दिली आहे. या मतदान केंद्रांची यादी http://pune.nic.in या संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध असून, त्याच्या प्रती जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात आणि संबंधित मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या उपस्थितीत पोटनिवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समन्वयक अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. पोलिस उपायुक्त आर. राजा, संदीप सिंह गिल, निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले आदी उपस्थित होते. सुरक्षा व्यवस्था, मतमोजणी केंद्राची व्यवस्था, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन, स्वीप कार्यक्रम, ईव्हीएमसाठी मतपत्रिका मुद्रण, टपाल मतदान आदी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.