चित्रपट निर्मितीसाठी ‘फिल्म स्टॉक एक्स्चेंज’ उभारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रपट निर्मितीसाठी ‘फिल्म स्टॉक एक्स्चेंज’ उभारणार
चित्रपट निर्मितीसाठी ‘फिल्म स्टॉक एक्स्चेंज’ उभारणार

चित्रपट निर्मितीसाठी ‘फिल्म स्टॉक एक्स्चेंज’ उभारणार

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः राज्यातील चित्रपट क्षेत्राच्या प्रगतीसाठी कोल्हापूर येथे नवीन चित्रनगरी उभारण्यासह चित्रपटांचे अनुदान वाढवण्याचा शासन निर्णयही लवकरच काढला जाईल. तसेच, ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’च्या धर्तीवर राज्य सरकार ‘फिल्म इक्विटी स्टॉक एक्स्चेंज’ सुरू करणार आहे. ज्यांच्याकडे चांगली संहिता आहे, परंतु आर्थिक पाठबळ नाही, त्यांना याद्वारे चित्रपट निर्मिती करता येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी केली.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकारतर्फे आयोजित २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व निर्माते जानू बरवा, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल आदी उपस्थित होते.

‘एसएनडीटी’ची शाखा काढण्यासाठी चंद्रकांत दादा यांनी मला तीनशे कोटी रुपयांचा निधी दिला. मी कर्ज घेतले तर मी व्याजासह परत करतो, त्यामुळे व्याज म्हणून कोल्हापूरची चित्रनगरी अतिशय अद्ययावत करेन. दादांना राजकारण सोडावेसे वाटले, तर ते क्षेत्र त्यांच्यासाठी खुले राहील, अशी गंमतीशीर ऑफरही मुनगंटीवार यांनी दिली.

‘पुण्यात फिल्म सिटी उभारा’
‘‘मुंबईला हिंदी चित्रपटांची जन्मभूमी आणि कर्मभूमी मानतात. तर पुण्याला मराठी चित्रपटांची कर्मभूमी म्हणता येईल. आजघडीला बहुतांश मराठी कलाकार पुण्यातच राहतात. मात्र, त्यांना चित्रीकरणासाठी सतत मुंबईला जावे लागते. त्यामुळे पुण्यात आम्ही जागा देऊ, पण पुण्यात एक दर्जेदार फिल्म सिटी उभी करा’’, अशी मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वेळी केली.

आजकाल आपण सगळे मोबाईल किंवा दूरचित्रवाणीवरच चित्रपट पाहतो. त्यामुळे चित्रपटगृहात जाण्यासाठी लोक उत्सुक असतील का, याबाबत मला शंका होती. पण पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने ही शंका खोटी ठरवली. पुण्याचे प्रेक्षक खरोखर दर्दी आहेत. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव असो किंवा कोणताही नाट्य-चित्रपट महोत्सव, पुणेकर रसिक सगळीकडे गर्दी करतात. ही कौतुकास्पद बाब आहे.
- विद्या बालन, सुप्रसिद्ध अभिनेत्री