
आमची कामे करेल त्यालाच मत!
पुणे, ता. १० ः कसबा पेठेतील निवडणुकीबाबत काही कल्पना नाही. कोण उभे राहिले आहे, याबद्दल काही माहीत नाही. निवडणूक असेल त्या दिवशी मतदान करू. जो आमची कामे करेल त्यालाच आम्ही मत देणार, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कसबा विधानसभा मतदारसंघातील महिला मतदारांनी.
एकीकडे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील राजकीय घडामोडींनी वेग पकडला आहे. यानिमित्ताने ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी तेथील महिला मतदारांची मते अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, बहुतांश महिला निवडणुकीबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले. त्यामुळे अधिकाधिक महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर असेल. विशेषतः प्रचारासाठी अवघ्या दोन आठवड्याचा कालावधी उरला असताना या काळात आपला अजेंडा महिलांपर्यंत नेण्यासाठी उमेदवारांच्या जनसंपर्क कौशल्याचा कस लागणार आहे.
कसबा विधानसभेच्या पोटनिवणुकीबाबत विचारले असता एका महिलेने ‘ते विधानसभा म्हणजे मुक्ता टिळक यांचं कार्यालय होतं ना, आता कुठे असेल मग?’, असा प्रांजळ प्रतिप्रश्न विचारला. निवडणूक कधी आहे आणि कशासाठी आहे, हा प्रश्नही बहुतेक महिलांना पडला होता. ‘आमच्या समस्या नगरसेवकांना सांगतो, ते सोडवतात. आमदारांना काय सांगायचे’, असंही काहींनी म्हटले. तर, ‘जो आमची कामं करून देणार, त्यांनाच मत देणार’, अशी रोखठोक भूमिका काही महिलांनी मांडली.
आम्ही नाना पेठेत राहतो. आमची इमारत साठ वर्षे जुनी आहे, त्याचा पुनर्विकास अजून झाला नाही. पावसाळ्यात घर गळते देखील. पाण्याचा प्रश्न आहेच. या समस्या सोडविणाऱ्या व्यक्तीलाच आम्ही मत देऊ.
- मंगला गायकवाड, गृहिणी
कसबा विधानसभा पोटनिवणुकीबद्दल काही माहिती नाही. आता कोणी उमेदवार प्रचाराला आले, तर कळेल. त्यांच्या आश्वासनानंतर कोणाला मत द्यायचे ते ठरवू.
- प्रीती उबाळे, घरेलू कामगार
महिला मतदारांची संख्या अधिक
- कसबा विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे.
- एकूण मतदारांची संख्या २,७५,४२८ इतकी आहे.
- यात महिला मतदारांची संख्या १,३८,५५० इतकी
- पुरुष मतदारांची संख्या १,३६,८७३
- तृतीयपंथी मतदारांची संख्या ५ अशी आहे.
- त्यामुळे महिला मतदारांची मते येथे निर्णायक ठरू शकतात.