
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीतर्फे ‘विद्यार्थी संवाद’ कार्यक्रम
पुणे, ता. ९ : ‘‘चांगली पुस्तके, चांगले संगीत, योगकला आपल्या मनाची चांगली मशागत घडून आणतात. विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी स्वतःवर कष्ट घेतले पाहिजेत. अभ्यास करताना आपल्यामधला आळस झटकावा, कोणतीही गोष्ट एकदा करायची ठरवली, तर अशक्य मुळीच नाही,’’ असे पुणे शहर पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित ‘विद्यार्थी संवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे होते. सोसायटीच्या सहकार्यवाह आणि महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्ष प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे आणि उपकार्यवाह प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे या वेळी उपस्थित होत्या. कर्णिक म्हणाले, ‘‘कठीण काळातील ताणतणावाचे व्यवस्थापन करताना आपण स्वतःवर यापूर्वी किती कष्ट घेतले आहेत, त्याचा अधिक उपयोग होतो. दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव माणसाला येतात, त्यातले वाईट अनुभव माणसाला खूप काही शिकवतात.’’ मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी स्वागत केले. नियोजन संस्थेचे सचिव प्रा. श्यामकांत देशमुख यांनी केले. प्रा. रेणू भालेराव यांनी सूत्रसंचालन केले.