‘आरोग्या’तील संशोधनात डेटा सायन्सला महत्त्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आरोग्या’तील संशोधनात डेटा सायन्सला महत्त्व
‘आरोग्या’तील संशोधनात डेटा सायन्सला महत्त्व

‘आरोग्या’तील संशोधनात डेटा सायन्सला महत्त्व

sakal_logo
By

पुणे, ता. १० : ‘‘आरोग्य क्षेत्रात संशोधनासाठी डेटा सायन्सचे महत्त्व प्रचंड आहे. आपल्या देशातील उपलब्ध माहितीचे (डेटा) योग्य पद्धतीने वर्गीकरण आणि विश्लेषण केल्यास समाजातील आरोग्य समस्या सोडवण्यास त्याची मदत होईल,’’ असा विश्वास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) माधुरी कानिटकर यांनी केले.
विद्यापीठात ‘वर्कशॉप ऑन डेटा सायन्स इन हेल्थकेअर फॉर एज्युकेशन’, ‘रिसर्च अँड पब्लिक हेल्थ’ या विषयावर कार्यशाळा व हार्वर्ड युनिव्हर्सिटी, ‘सी-डॅक'' आणि ‘ओमनीक्युरस संस्थे’समवेत विद्यापीठाचा सामंजस्य करार करण्यात आला. कार्यशाळेचे उद्‍घाटन कानिटकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, हार्वर्ड विद्यापीठाच्या ‘आयटूबीटू ट्रानस्मार्ट फाउंडेशन’चे सहायक प्राध्यापक डॉ. कवीश्वर वाघोलीकर, ‘सी-डॅक’चे कार्यकारी संचालक विवेक खनिजा, ओमनिक्युरस संस्थेच्या प्रतिनिधी सौम्या जयकृष्णन, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ उपस्थित होते.
कानिटकर म्हणाल्या, ‘‘आरोग्य क्षेत्रात काम करताना अचूक उपचार होणे गरजेचे असते. यासाठी रुग्णांची आजारासंबंधी माहिती व त्याचे पृथ्थकरण करणे आवश्यक असते. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून संकलित माहितीवर कमी वेळात प्रक्रिया करणे शक्य आहे. आरोग्य क्षेत्रात संशोधन कार्याला चालना देण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने तंत्रज्ञानाशी संबंधित संस्थांशी सामंजस्य करार केला आहे. या माध्यमातून संशोधन व सामाजिक आरोग्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील. नाशिक येथील जिल्हा रुग्णालयासमवेत करण्यात आलेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून अनेक अद्ययावत तंत्रज्ञान व सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे कमी वेळात अधिक रुग्णांना आरोग्यसेवा देणे सुकर झाले.’’
डॉ. चंदनवाले म्हणाले, ‘‘वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसंख्येच्या डेटाचा वापर व्यापक प्रमाणावर संशोधनासाठी होईल.’’
जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. चित्रा नेतारे यांनी आभार मानले. कार्यशाळेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, सहायक संचालक डॉ. उत्कर्ष दुधेडिया, जितेंद्र सिंग आदी उपस्थित होते.