
आधी काम, मग प्रशिक्षण!
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १३ : निवड झाल्यानंतर प्रशिक्षण घ्यावयाच्या, दरम्यानच्या कालवधीत त्याचा वापर करून दुसरीकडे नोकरीसाठी अर्ज करून निवड झाली, की पहिली नोकरी सोडून द्यावयाची, असा अनुभव सध्या सरकारी खात्यांना येत आहे. यामुळे भूमी अभिलेख विभागाने उलटा पर्याय निवडला आहे. भरती केलेल्या उमेदवारांना ‘आधी काम आणि मग प्रशिक्षण’ देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतल्यानंतर संबंधित उमेदवार कामावर राहील यांची शाश्वती झाल्यानंतरच त्यांना प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात येणार आहे. त्यानंतरही काही उमेदवार गळाल्यास त्यांच्या जागी प्रतिक्षा यादीतील उमेदवार देण्यात येणार आहे.
का घेतला निर्णय?
- भूमी अभिलेख विभागाकडून १११३ भूकरमापक (सर्वेअर) पदासाठी नुकतीच परीक्षा घेऊन निकालही जाहीर
- या भरतीमधून पुणे विभागात २६३, नागपूर विभागात १८९, कोकण-मुंबई विभागात २४४, नाशिक विभागात १०२, औरंगाबाद २०७, तर अमरावती विभागात १०८ रिक्त असलेल्या जागा भरण्यात आल्या.
- यापूर्वी रिक्त जागांवर भरती केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम प्रशिक्षण दिले
- प्रशिक्षण दिल्यानंतर अथवा प्रशिक्षणानंतर अनेक उमेदवार सोडून गेले
- त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने आधी काम नंतर प्रशिक्षणाचा निर्णय घेतला
महत्त्वाचे टप्पे
- भरती परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना या महिनाअखेरीस नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहेत.
- त्यानंतर भूमी अभिलेख विभागाचे विभागीय अधिकारी जिल्हा वाटप करतील.
- या जिल्ह्यांमध्ये तालुकास्तरावर या उमेदवारांना सहायक भूकरमापक म्हणून कामाचा अनुभव दिला जाणार आहे.
- या दरम्यान संबंधित उमेदवारांचे काम, त्यांना या कामात किती रस आहे, हे यातून त्यांची तपासणी केली जाणार आहे.
- त्यानंतर औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी येथे जून महिन्यात ९० दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- काही उमेदवार निकालानंतर एक महिन्यात रुजू न झाल्यास किंवा रुजू झालेले उमेदवार काही कारणांनी सोडून गेल्यास जागा रिक्त राहू नयेत म्हणून प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.
- सध्या या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी प्रक्रियेसाठी पाचारण करण्यात आले आहे.
भूकरमापक या पदाच्या भरतीसाठी नुकतीच परिक्षा घेऊन निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापूर्वी भरती झालेले उमेदवार प्रशिक्षणानंतर सोडून जातात असा अनुभव आहे. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी पुन्हा सरकारकडे मागणी करून भरती प्रक्रिया राबवावी लागते. या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन यंदा प्रथमच भरती परीक्षेच्या निकालानंतर प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. काही कारणांनी नियुक्त झालेले उमेदवार हजर झाले नाहीत, तर प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.
- आनंद रायते, अतिरिक्त आयुक्त, भूमी अभिलेख विभाग