
महादजी शिंदे हे आदर्श राज्यकर्ते ः पांडुरंग बलकवडे
पुणे, ता. १३ ः महादजी शिंदे यांनी पानिपतानंतर दहा वर्षात दिल्ली पुन्हा जिंकली. २५ वर्षे परकीयांच्या आक्रमणापासून दिल्ली आणि हिंदुस्थानचे रक्षण केले. ते जसे अजिंक्य सेनानी होते तसेच आदर्श राज्यकर्तेही होते. त्यांचे लोककल्याणकारी राजकारण आणि आदर्श प्रशासन, यापासून आजच्या राज्यकर्त्यांनी धडा घेतला पाहिजे, असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.
भारत इतिहास संशोधक मंडळ आणि महादजी शिंदे स्मृती समिती यांच्यातर्फे महादजी शिंदे यांची पुण्यतिथी आणि दिल्ली विजय दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. याच कार्यक्रमात इतिहास अभ्यासक प्रमोद करजगी लिखित ‘महान मराठा सेनानी महादजी शिंदे’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी माजी खासदार प्रदीप रावत, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, मंडळाचे खजिनदार प्रा. नंदकुमार निकम, अनाहत प्रकाशनच्या उमा बोडस आदी उपस्थित होते. रावत म्हणाले, ‘‘इंग्रजांसारख्या जगातील सगळ्यात आधुनिक शत्रूपासूनच भारताला सगळ्यात जास्त धोका आहे, याची जाणीव असणाऱ्या महादजींनी स्वतः आधुनिक सैन्य उभारून त्यांच्याशी यशस्वी मुकाबला केला व २५ वर्षे देशाचे रक्षण केले. आम्हाला आमचे स्वातंत्र्य टिकवायचे असेल व देश समृद्ध करायचा असेल तर आधुनिकतेची कास धरावी लागेल.’’ अतिथींचे स्वागत मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. बी. डी. कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन गुरुप्रसाद कानिटकर यांनी केले.