
चार कोटींची वीजचोरी उघड
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १३ : महावितरणच्या भरारी पथकाने जानेवारीत जुन्नर व उरुळी कांचन येथे धाड टाकून चार कोटी ९८ लाख रुपयांच्या १५० वीज चोरीच्या घटना उघडकीस आणल्या. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. तसेच इतर अनियमिततेच्या ९८ प्रकरणात चार कोटी ६० लाखाची बिले देण्यात आलेली आहे. उघडकीस आलेल्या चोरींमध्ये तीन मोठ्या चोऱ्या असून या ग्राहकाविरूद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पुणे ग्रामीण भागातील जुन्नर परिसरात भरारी पथकाने धाड टाकून स्टोन क्रशर कंपनीची वीजचोरी उघडकीस आणलेली आहे. या औद्योगिक ग्राहकाने मीटरमध्ये फेरफार करून दोन लाख १९ हजार ६८७ युनिटची वीजचोरी केल्याचे तपासात आढळून आले. त्याला ४६ लाख ६३ हजार रूपयांचे वीजचोरीचे बील महावितरणकडून देण्यात आले आहे. दुसऱ्या एका प्रकरणात पुणे ग्रामीण भागातील उरुळी कांचन परिसरात भरारी पथकाने धाड टाकून स्टोन क्रशर कंपनीची वीजचोरी उघडकीस आणली. या औद्योगिक ग्राहकाने मीटरमध्ये फेरफार करून दोन लाख ७५ हजार ७८२ युनिटची चोरी केल्याचे आढळून आले. त्यांना ४८ लाख रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे. तिसऱ्या प्रकरणात उरुळी कांचन परिसरात भरारी पथकाने धाड टाकून आणखी एका स्टोन कशर कंपनीची वीजचोरी उघडकीस आली. या औद्योगिक ग्राहकाने मीटरमध्ये फेरफार करून दोन लाख ०५ हजार ३८ युनिटची युनिटची चोरी केल्याचे आढळून आले आहे. त्याला ३६ लाख ९६ हजार रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.
भरारी पथक मोहिमा
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी मोठ्या प्रमाणात वीजचोरी शोध मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक प्रमोद शेवाळे व पुणे प्रादेशिक विभागाचे उपसंचालक सुमित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वीज चोरीविरुद्ध भरारी पथक मोहिमा राबवित आहे.