मायलॅबच्या ‘मायबिम’चे क्षयरोग निर्मूलनात सहकार्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मायलॅबच्या ‘मायबिम’चे
क्षयरोग निर्मूलनात सहकार्य
मायलॅबच्या ‘मायबिम’चे क्षयरोग निर्मूलनात सहकार्य

मायलॅबच्या ‘मायबिम’चे क्षयरोग निर्मूलनात सहकार्य

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : क्षयरोगाचे (टीबी) लवकर निदान करणारे प्रभावी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी ‘मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स’ आणि ‘क्युअर एआय’ या ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (एआय) क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था एकत्र आल्या आहेत. ‘मायबिम’ उपकरणाच्या माध्यमातून देशातील क्षयरोग निर्मूलनाचा मोहिमेला या दोन्ही संस्था हातभार लावतील.

छातीच्या क्ष-किरणाच्या माध्यमातून क्षयरोगाचे लवकर अचूक निदान करण्यासाठी ‘एआय’चा वापर आता करण्यात येणार आहे. त्यासाठी मायलॅबतर्फे क्षयरोगाच्या अचूक आणि वेगाने निदानासाठी ‘मायबिम’ तंत्र विकसित केले आहे. त्यात अत्याधुनिक ‘एआय’चे अद्ययावत सॉफ्टवेअर वापरण्यात आले आहे. त्यामुळे क्षयरोगानाचे लवकर निदान करून रुग्णाला उपचाराकरिता आणण्यासाठी ‘मायबिम’ हे प्रभावी साधन ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

देशातून २०२५ पर्यंत क्षयरोगाला हद्दपार करण्याचा उद्देश निश्चित केला आहे. या मोहिमेत ‘मायबिम’ची भूमिका महत्त्वाची ठरेल. क्षयरोगाचा धोका असलेल्या नागरिकांची तपासणी यातून शक्य होणार असल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले.

मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ म्हणाले, ‘‘क्षयरोगाचे लवकर निदान, त्यावर अचूक उपचार आवश्यक असतात. क्षयरोगाची तपासणी, निदान आणि प्रतिबंध यासाठी मायलॅब आधुनिक पर्याय उपलब्ध करत आहेत. क्षयरोग निदानात उपकरण आणि सॉफ्टवेअर याचे महत्त्व अधिक असते. मायलॅबने विकसित केलेल्या ‘मायबिम’या उपकरणासाठी ‘क्युअर एआय’ने रेडिओलॉजिकल क्षेत्रात सहकार्य केले आहे. त्यामुळे राष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी हे संयुक्त उपक्रम प्रभावी ठरतील.’’

‘क्युअर एआय’चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत वारियर म्हणाले, ‘‘देशातून क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी दोन्ही कंपन्या एकत्र आल्या आहेत. ‘एआय’ची सुविधा असलेले आणि सहजतेने कुठेही घेऊन जाता येईल असे एक्स-रे उपकरण हे यात प्रभावी ठरेल.’’