नदी संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर समन्वयाची भूमिका केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांचे प्रतिपादन; ‘धारा २०२३’चा समारोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नदी संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर समन्वयाची भूमिका
केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांचे प्रतिपादन; ‘धारा २०२३’चा समारोप
नदी संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर समन्वयाची भूमिका केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांचे प्रतिपादन; ‘धारा २०२३’चा समारोप

नदी संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर समन्वयाची भूमिका केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांचे प्रतिपादन; ‘धारा २०२३’चा समारोप

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : ‘‘रिव्हर सिटी अलायन्समुळे (आरसीए) देशातील १०७ शहरे सध्या एकमेकांशी जोडली गेली आहेत. यामध्ये १६ स्मार्ट सिटींचा समावेश आहे. ७२ नद्या या शहरांमध्ये आहेत. पुढच्या धारा परिषदेपर्यंत यातील सहभागी शहरांची संख्या १५० पर्यंत जावी. या परिषदेमधून नदी संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर समन्वयाची भूमिका तयार होत आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांनी केले.

केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालय आणि पुणे महापालिकेतर्फे आयोजित ‘धारा २०२३’ या परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. नमामि गंगे अभियानाचे महासंचालक जी. अशोककुमार, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्सचे संचालक हितेश वैद्य या वेळी उपस्थित होते.

किशोर म्हणाले, ‘‘नदीसंवर्धन करण्यासाठी ‘स्वच्छ धारा, संपन्न किनारा’ हा संदेश आपल्याला नागरिकांपर्यंत पोचवायचा आहे. जलसुरक्षा ही केंद्र, राज्य व महापालिकांची सामूहिक जबाबदारी आहे. केंद्राची दोन्ही मंत्रालये एकत्रित आल्याने जलस्रोतांचे संरक्षण आणि शाश्वत शहरी विकासाच्या प्रगतीवर ‘आरसीए’च्या सदस्यांनी
आज भर दिला आहे. या दोन दिवसीय परिषदेतून महापालिका आयुक्त, कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी शहरी नद्यांच्या व्यवस्थापनाबाबत चर्चा आणि चांगल्या कार्यपद्धतीचे सहशिक्षण होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

हितेश वैद्य म्हणाले, ‘‘आरसीएतील १०७ शहरांमधील जलसंवर्धन आणि जल सुरक्षा वाढविणे या सामाईक उद्दिष्टांना दोन मंत्रालयांनी एकत्रितपणे बळकटी दिली आहे. नद्यांच्या व्यवस्थापनाच्या भविष्यातील वाटचालीत वातावरणीय बदल, अर्थपुरवठा, माहिती साठ्याचे वितरण, कार्यवाहीच्या दृष्टीने संशोधन, क्षमता वाढविणे आणि
सर्वांगीण भागीदारी हे ‘मिशन धारा’चा आधारस्तंभ असेल.

पंतप्रधान मोदींकडून कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘धारा २०२३’ चे कौतुक केले. यासंदर्भातील त्यांचा संदेश परिषदेत वाचून दाखविण्यात आला. ‘‘जलसुरक्षेची निश्चिती ही यू २० ची संकल्पना जगातील सर्व राष्ट्रे आणि समाजासाठी सर्वाधिक महत्त्वाची चिंता अधोरेखित करत आहे. २१व्या शतकात पाणी उपलब्धता हे मोठे आव्हान असणार आहे. शहरी नद्यांना नव्या प्रकारच्या दृष्टिकोनाची ओळख करून द्यायचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी ‘आरसीए’च्या माध्यमातून देशभरातील १०७ शहरे एकत्र येणे हे या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे,’’ असे मोदी यांच्या संदेशात म्हटले आहे.