
महसूल कर्मचाऱ्यांची अनाथालयाला सव्वा लाखांची मदत
पुणे, ता. १४ ः सेवानिवृत्तीनंतरही समाजाशी काहीतरी देणं आहे, या भावनेतून पुणे शहर व जिल्ह्यातील सेवानिवृत्त महसूल कर्मचाऱ्यांनी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील सहारा अनाथालयाला एक लाख १७ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. या स्नेहमेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी अनाथालयाची व्यथा सेवानिवृत्त महसूल कर्मचाऱ्यांसमोर मांडली आणि त्यांचे भाषण संपताच, सेवानिवृत्तांनी ही केवळ अर्ध्या तासात ही रक्कम जमा केली. जमा रक्कम प्रमुख पाहूणे म्हणून आलेले सहारा अनाथालयाचे प्रमुख संतोष गर्जे यांच्याकडे सुपूर्द केली.
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने महसूल विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पुण्यात स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दीपक चव्हाण, पुणे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास कंडेपल्ली यांनी पुढाकार घेतला. राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत पाचारणे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दीपक चव्हाण, पुणे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास कंडेपल्ली, सचिन तारू, सचिन तांबोळी, मिलिंद पोळ, संजय शिंदे, पल्लवी कोकाटे, विनायक राऊत, प्रदीप जावळे, मनिषा पोवार आणि सेवानिवृत्त कर्मचारी शशिकांत नेवासकर, किशोर गंभीर, विजय केंगले, बिपिन जाधव, पंढरीनाथ चोंधे पाटील, उत्तमराव चोरगे, पंढरीनाथ पोकळे आदी उपस्थित होते. राज्य उपाध्यक्ष दीपक चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कर्मचारी संघटनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. संजय पोमण यांनी सूत्रसंचालन केले.