
निरीक्षकांच्या उपस्थितीत मशिनचे रँडमायझेशन पूर्ण
पुणे, ता. १४ : कसबा पेठ व चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष तसेच पथकातील इतर अधिकाऱ्यांची संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून दुसरी सरमिसळ (रॅंडमायझेशन) निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल, एस. सत्यनारायण आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत मंगळवारी करण्यात आली. रॅंडमायझेशनवेळी प्रशिक्षित मनुष्यबळातून मतदान पथके तयार करून त्यांना संगणकीय प्रणालीने विधानसभा मतदारसंघ नेमून देण्यात आले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५१० मतदान केंद्रे व कसबा पेठ विधानसभा मतदार संघात २७० मतदान केंद्रे याप्रमाणे ७८० मतदान केंद्रे आहेत. त्याव्यतिरिक्त नियमानुसार १० टक्के राखीव मनुष्यबळाची तरतूद करणे आवश्यक असते. त्यानुसार पहिल्या सरमिसळीच्या (रॅंडमायझेशन) वेळी निवडणूक प्रकियेसाठी सर्व मनुष्यबळाची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. चिंचवड मतदारसंघासाठी याप्रमाणे ५६१ मतदान पथके आणि कसबा पेठ मतदारसंघासाठी २९७ पथके याप्रमाणे एकूण ८५८ पथके करण्यात आली आहेत. यात ८५८ मतदान केंद्राध्यक्ष, ८५८ मतदान अधिकारी-एक, इतर मतदान अधिकारी ८५८ पुरुष व ८५८ महिला याप्रमाणे पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली.
दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघात १३ संवेदनशील मतदान केंद्रे आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात ९ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रांच्या अनुषंगाने घ्यावयाची विशेष काळजी, सादर करायचे अहवाल यांच्या अनुषंगाने प्रशिक्षण या वेळी देण्यात येणार आहे.