
ज्येष्ठ गायक हरिहरन यांना स्वरगायत्री पुरस्कार
पुणे, ता. १५ : ‘भोई प्रतिष्ठान’ व ‘गायत्री व्हॉइस क्लिनिक’ यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा स्वरगायत्री पुरस्कार ज्येष्ठ गायक हरिहरन यांना जाहीर झाला आहे. मंगळवारी (ता. २१) सायंकाळी सहा वाजता डीपी रस्त्यावर असलेल्या शुभारंभ लॉन्समध्ये पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. या कार्यक्रमासाठी आलूमेलो मणी (हरिहरन यांची आई), ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल, माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, लेखक डॉ. अच्युत गोडबोले, शास्त्रीय गायक डॉ. भरत बलवल्ली आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या वेळी उपस्थित राहणार असून, खासदार श्रीनिवास पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. पद्मश्री तालयोगी सुरेश तळवलकर, पं. विकास कशाळकर, पं. सुहास व्यास, अशोक कुमार सराफ (मेलडी मेकर्स) यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी लिहिलेल्या ‘व्हॉइस केअर फॉर सिंगर्स’ या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी होईल.