भूमिगत मेट्रो कसब्यासाठी महत्त्वाची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भूमिगत मेट्रो कसब्यासाठी महत्त्वाची
भूमिगत मेट्रो कसब्यासाठी महत्त्वाची

भूमिगत मेट्रो कसब्यासाठी महत्त्वाची

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः दाट लोकवस्तीच्या कसबा विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी येत्या महिन्याभरात सुरू होणारी भूमिगत मेट्रो महत्त्वाचा मुद्दा ठरेल, अशी चिन्हे आहेत.
बुधवार पेठ व मंडई ही मेट्रोची दोन मोठी भूमिगत स्थानके कसबा मतदारसंघात येतात. या भागातील एकाही कुटुंबाचे विस्थापन न होता मेट्रो अस्तित्वात येत असल्याकडे कार्यकर्ते लक्ष वेधताना दिसत आहेत. अत्यंत दाट लोकवस्ती, सततची वाहतूक कोंडी आणि पुरेशा पार्किंगचा अभाव यामुळे शहरातील प्रमुख व्यापारी पेठांमधील व्यवसायावर मर्यादा आल्या होत्या. त्यावर मेट्रो हे उत्तर ठरू शकेल, अशी व्यावसायिकांची धारणा आहे.
याविषयी कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या प्रचार प्रमुख आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, ‘‘भाजपची हिंदुत्वाची व्याख्याच विकासाभिमुख राजकारण अशी आहे. पुणे मेट्रो प्रकल्प हे याचे उत्तम उदाहरण आहे. मेट्रो संपूर्ण शहरालाच वरदायी राहणार असून, मध्यवर्ती भागातील पेठेतील नागरिकांसाठी ती विशेष सोयीची ठरणार आहे.’’
भाजप व मित्रपक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांनी वाहतूक कोंडीवर ठोस उपाय म्हणून मध्यवस्तीत ‘पुण्यदशम’ नावाने मिडी बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, हे मतदारांना आवर्जून सांगितले जात आहे.
कसबा मतदारसंघातून जाणारा मेट्रोचा मार्ग शनिवारवाडा, लाल महाल, भिडे वाडा, मंडई अशा अनेक ऐतिहासिक वास्तूंचा समावेश असलेला महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच इथे भूमिगत मार्ग साकारण्याचे आव्हान मोठे होते. बुधवार पेठ ते स्वारगेट या भूमिगत पट्ट्यातील दोन किलोमीटर लांबीचा बोगदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गेल्यावर्षी अवघ्या १० महिन्यांत पूर्णत्वास नेण्यात आला. नदीखालून मेट्रोसाठी बोगदा बांधण्याचा प्रयोग करणारे पुणे हे देशातील चौथे शहर ठरले आहे. मध्यवस्तीतील वाहतुकीचा आयाम बदलणारा हा प्रकल्प ठरू शकतो.