
टपाली मतदान गुरुवारपासून सुरू
पुणे, ता. १५ : केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले मतदार व दिव्यांग मतदार यांच्यासाठी टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या मतदारसंघातील २९९ ज्येष्ठ नागरिक व ४ दिव्यांग मतदारांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली असून, गुरुवारपासून (ता. १६) ते २२ तारखेपर्यंत मतदान अधिकारी संबंधित व्यक्तींच्या घरी जाऊन टपाली मतदान घेणार आहेत.
टपाली मतदानासाठी आठ पथके असून, या पथकांमध्ये मतदान अधिकारी, कर्मचारी, पोलिस, व्हिडिओग्राफर असतील. गोपनीयतेचा भंग होणार नाही, अशा पद्धतीने टपाली मतदानाचे व्हीडिओ शूटिंग केले जाणार आहे, अशी माहिती कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली.
त्या म्हणाल्या, ‘‘मतदान घेण्यासाठीचे आवश्यक ते प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. तसेच याची पूर्वतयारीसुद्धा पूर्ण झाली आहे. या कामकाजासाठी प्रत्यक्ष अशा मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान घेण्यासाठी ८ पथकांची नेमणूक केली आहे. या पथकामध्ये पथकप्रमुख तथा मतदान अधिकारी क्र. १ म्हणून सेक्टर ऑफिसर, मतदान अधिकारी क्र. २ म्हणून महसूल कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. या कामकाजावर निरीक्षण ठेवण्यासाठी मायक्रो ऑब्झर्व्हर, मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यासाठी व्हिडिओग्राफर व पोलिस कर्मचारी यांचा पथकामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.’’