राज्यात उसाची सर्वाधिक लागवड
पुणे, ता. १५ : महसूल विभागाच्या ई-पीक पाहणीत बारमाही पिकांच्या नोंदणीत यंदा ऊस या नगदी पिकाची सर्वाधिक नोंदणी झाली आहे. राज्याच्या ४ लाख पाच हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर केळी, तर तिसऱ्या क्रमांकावर संत्री पिकाची नोंदणी झाली आहे.
ई-पीक पाहणीत शेतकरी पिकांची माहिती तसेच पिकांची छायाचित्रे अपलोड करू शकतात. संबंधित शेतकऱ्याने पिकांचे नोंद ई-पीक पाहणी उपयोजनमध्ये न केल्यास ती तलाठी कार्यालयाच्या वतीने करण्यात येते. त्यानुसार २०२२-२३ या वर्षासाठी महसूल विभागाने केलेल्या ई-पीक पाहणी नोंदणीत आतापर्यंत राज्यात सर्वाधिक ऊस या पिकाची नोंदणी झाली असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले.
दरम्यान, केळी या पिकाची एक लाख १८ हजार ५९२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. जळगाव भागात आतापर्यंत केळी पिकाची जास्तीत जास्त लागवड होत असे. आता मात्र जळगावसह राज्याच्या उर्वरित भागातही या पिकाचे क्षेत्र वाढू लागले आहे. संत्री या पिकाची राज्यातील ८५ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. याबरोबरच डाळिंब पिकाची लागवड ६५ हजार ९५२ हेक्टर क्षेत्रावर झाली असून, हे पीक आता राज्यातील सर्वच भागात मूळ धरू लागले आहे. द्राक्षाची लागवड वाढली असून सुमारे ६५ हजार ६३९ हेक्टर क्षेत्रावर सध्या लागवड झाली आहे.
केवळ पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून ऊस हे नगदी पीक घेण्याची जोरदार स्पर्धा होती. आता, मात्र ही स्पर्धा राज्यभर पोचली आहे. त्यानुसार राज्यातील सर्वच विभागात मिळून चार लाख पाच हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस या पिकाची नोंदणी झाली असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे मराठवाडा, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात आतादेखील ऊस या नगदी पिकाचे उत्पादन वाढू लागल्याचे दिसून आले आहे. महसूल विभागाने ई-पीक पाहणीनुसार ही लागवड ऑगस्टपासून गृहीत धरलेली आहे. पुढील वर्षी ऊस या नगदी पिकाच्या लागवडीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.