आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी पथके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी पथके
आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी पथके

आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी पथके

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, आचारसंहिता काळात पैशाच्या उधळपट्टीवर लक्ष ठेवण्यासाठी आता आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग आणि महानगरपालिका क्षेत्रिय अधिकारी यांची मदत घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत असलेल्या उमेदवारांकडून दाखल करण्यात आलेल्या खर्चाची तपासणी बुधवारी करण्यात आली. तसेच, मतदारसंघात तीन तपासणी नाके उभारण्यात आले असून, त्यांच्या माध्यमातून वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे.

कसब्यातील पोटनिवडणुकीसाठी नीरज सेमवाल (सामान्य प्रशासन), अश्‍विनीकुमार (पोलिस प्रशासन) तर मंझरूल हसन (महसूल) असे तीन निवडणूक निरीक्षक पुण्यात यापूर्वीच दाखल झाले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाच्या तपशिलांचा आढावा महसूल निरीक्षकांकडून घेण्यात आला आहे. या वेळी आयकर विभाग आणि उत्पादन शुल्क विभागातील अधिकारीदेखील उपस्थित होते, तर दोन टप्प्यातील ताळेबंद २० आणि २४ फेब्रुवारी रोजी तपासण्यात येणार आहे, अशी निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली.

निवडणूक आयोगाच्या नवीन निर्देशांनुसार उमेदवारांच्या प्रचारखर्चासाठी २८ लाखांऐवजी ४० लाखांपर्यंत मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे प्रचारासोबत कार्यकर्ते, मतदार यांना खूष करण्यासाठी रोखीचे आणि छुपे व्यवहार या कालावधीत जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदारसंघातील आर्थिक घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, कसबा विधानसभा मतदारसंघात शनिवारवाडा, दांडेकर पूल आणि स्वारगेट या ठिकाणी तपासणी पथके (सर्व्हायलन्स टीम) तैनात करण्यात आल्या आहेत. तीन ठिकाणी एक पोलिस कर्मचारी, एक तपासणी अधिकारी, छायाचित्रिकरण करण्यासाठी एक व्यक्ती आणि एक निवडणूक विभागातील कर्मचारी अशा चार व्यक्ती येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत आहेत. प्रत्येक वाहनाची तपासणी करताना छायाचित्रीकरण केले जात आहे, असेही त्या म्हणाल्या.