वाहतूक कोंडीत ‘पेठा’ गुदमरल्या; रहिवाशांना मनस्ताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक कोंडीत ‘पेठा’ गुदमरल्या; रहिवाशांना मनस्ताप
वाहतूक कोंडीत ‘पेठा’ गुदमरल्या; रहिवाशांना मनस्ताप

वाहतूक कोंडीत ‘पेठा’ गुदमरल्या; रहिवाशांना मनस्ताप

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः कधी काळी पेठांमध्ये सामावलेलं पुणे केव्हाच ‘हद्द’ ओलांडून चारही दिशांना विस्तारले आहे. पुण्यातील अनेक ऐतिहासिक स्थळे, मंदिरे, वास्तू पेठेतच आढळतात. मुख्य बाजारपेठादेखील पेठांतच. पेठेतला जुन्या वाड्यांचा प्रश्न जसा गंभीर आहे, तसा वाहतुकीचा प्रश्नदेखील अत्यंत गंभीर आहे. अरुंद रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा होणारी वाहनांची पार्किंग, वाढलेली अतिक्रमणे, त्यात असणारी दाट लोकवस्ती यामुळे वाहतुकीचा गळा केव्हाच आवळला गेला आहे. बाजारपेठेतील दुकानदार असो वा रहिवासी त्यांना पेठेतून वाहन घेऊन जाणे म्हणजे मनस्ताप वाटतोय. सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे ‘पेठा’ गुदमरून गेल्या आहेत.
बुधवार पेठ असो की शुक्रवार पेठ, एकाही पेठेची वाहतूक कोंडीतून सुटका झालेली नाही. विशेषतः गुरुवारी, शनिवारी व रविवारी बाजारात येणाऱ्या वाहनधारकांची मोठी गर्दी असते. दुकानदारांनी आपल्या दुकानात येण्यासाठी ‘वाट’ मोकळी ठेवली, मात्र ग्राहकांसोबत येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगचा कोणताच विचार झालेला नाही. रस्त्यावर ज्या ठिकाणी मोकळी जागा दिसेल त्या ठिकाणी वाहने पार्किंग करून वाहनधारक निघून जातात. आधीच अरुंद रस्ते त्यात बेशिस्त होणारे पार्किंग यामुळे अन्य वाहतूकदारांना वाहन घेऊन जाणे जीवावर येते.

काय आहेत कोंडीची कारणे
- सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे अरुंद रस्ते. आता रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जागाच उपलब्ध नाही.
- जुने वाडे पडून त्या जागी इमारती बांधल्या जात आहेत. मात्र कमी एफएसआय असल्याने उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करण्याच्या हेतूने संपूर्ण जागेचा वापर घरासाठी होतो. पार्किंगसाठी जागा राहत नसल्याने रहिवासीदेखील रस्त्यावरच गाड्या लावतात.
- पेठांमध्ये रस्ते वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. एकेरी मार्ग, सम-विषम पार्किंग, असे कुठे आढळून येत नाही. असतील तिथे ते पाळले जात नाही.
- दुकानदाराकडे येणारी मोठी वाहने रस्त्याच्या मधोमधच वाहनातून माल उतरवत असतात. त्याचा फटकादेखील वाहनांना बसतो.
- मेट्रोच्या भुयारी स्थानकाचे काम.
- छोट्या व्यावसायिकांनी रस्तावरच थाटलेला व्यवसाय

या भागात कायम कोंडी
तपकीर गल्ली, पासोड्या विठ्ठल, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, बोहरी आळी, सोन्या मारुती चौक, तुळशीबाग, मंडई, दगडूशेठ गणपती मंडळाचा परिसर, कुंभारवाडा, फडके हौद, लाल महल, कसबा गणपती मंदिर चौक, आप्पा बळवंत चौक, विश्रामबाग वाडा आदी

गेल्या काही दिवसांत पेठांमध्ये छोट्या व्यावसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात बंगालमधून आलेल्यांची संख्या जास्त आहे. अशा व्यावसायिकांमुळे तसेच दुकानदारांकडे येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.
- हेमंत किराड, रहिवासी, नाना पेठ