
नोकरीच्या आमिषाने दोन कोटींना गंडा
पुणे, ता. १६ : ऑस्ट्रेलिया येथील कंपनीमार्फत व्हिसा आणि तेथेच नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुणांना बनावट ऑफर लेटर देऊन दोन कोटी ३८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका ४२ वर्षांच्या महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवम ऊर्फ सॅम जोशी (रा. ऑस्ट्रेलिया) आणि दीपिका कामदार (रा. नागपूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला. आरोपींनी ऑस्ट्रेलिया स्किल व्हिसा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत व्हिसा काढून देऊन नोकरी देणार असल्याचे सांगून काही तरुणांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया येथील नामांकित हॉटेलचे बनावट ऑफर लेटर दिले. ऑफर लेटर पाहून तक्रारदार व त्यांच्या कंपनीतील इतर अर्जदारांनी व्हिसा व अन्य कामासाठी त्यांना दोन कोटी ३८ लाख १८ हजार रुपये पाठविले. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.