पराभव दिसत असल्याने टोळधाडी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांची भाजपवर टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पराभव दिसत असल्याने टोळधाडी
काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांची भाजपवर टीका
पराभव दिसत असल्याने टोळधाडी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांची भाजपवर टीका

पराभव दिसत असल्याने टोळधाडी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांची भाजपवर टीका

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : ‘‘नागरिकांची कामे करणारा कार्यकर्ता कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीने उतरवल्याने भाजपला आपला पराभव दिसत आहे. त्यामुळे भाजपने अंमलबजावणी संचालनालय (ईडी), प्राप्तिकर विभाग तसेच पोलिसांच्या टोळधाडी सुरू केल्या आहेत, अशी टीका करून ‘‘मुंबई महापालिकेची चौकशी करणाऱ्यांनी पुणे महापालिकेच्या कारभाराची ‘ईडी, ‘सीबीआय’ आणि प्राप्तिकर खात्यामार्फत चौकशी करावी,’’ अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गुरुवारी (ता. १६) केली.

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ लोंढे पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी काँग्रेसचे निरीक्षक आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे उपस्थित होते. ‘‘रासने यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना विकासकामांसाठी आणलेल्या ५०० कोटी रुपयांचा हिशेब द्यावा,’’ अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

हेमंत रासने यांना मतदारसंघाच्या विकासासाठी निवडून येण्याचे करण्यात येत असलेले आवाहनच ते अकार्यक्षम असल्याचा पुरावा आहे, असे सांगून लोंढे म्हणाले, ‘‘ते सलग तीनवेळा स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी या तीन वर्षांत २८ हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. त्यातील ५०० कोटी रुपये स्वत:च्या मतदारसंघातील विकासकामांसाठी घेतले होते. त्याउलट मतदारसंघात कुठलाही विकास दिसत नाही. त्यामुळे हा निधी गेला कुठे, रासने यांनी या पैशांचा हिशोब दिला पाहिजे. या व्यवहाराची त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणी करण्याची गरज आहे.

‘‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून आंदोलन करणारे भाजपचे गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि ‘डंके की चोट’पर म्हणत छाती बडवणारे सध्या कुठे गेले आहेत. या नेत्यांना आता विलीनीकरण आठवत नाही का, ‘एमपीएससी’ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात उडी घेत त्यांचे उपमुख्यमंत्र्यांशी जाहीरपणे बोलणे करून देण्याचे नाटक करण्यात आले. या विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले आहेत का,’’ असा सवालही लोंढे एका प्रश्‍नाला उत्तर देताना केला आहे.

अंधारात शपथ का?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथेविषयी केलेल्या गौप्यस्फोटावर विचारले असता, लोंढे म्हणाले, ‘‘या शपथेची माहिती शरद पवार यांना होती तर मग लपतछपत पहाटेच्या अंधारात का शपथ घेतली. रात्री एक वाजता राष्ट्रपती राजवट का हटवली गेली. याचाही खुलासा झाला पाहिजे.’’