पुण्यात कांजण्यांच्या रुग्णांमध्ये वाढ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात कांजण्यांच्या
रुग्णांमध्ये वाढ!
पुण्यात कांजण्यांच्या रुग्णांमध्ये वाढ!

पुण्यात कांजण्यांच्या रुग्णांमध्ये वाढ!

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : पुणे शहरात कांजण्यांच्या रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. यात लहान मुलांबरोबरच प्रौढांमध्येही कांजण्यांचे निदान होत असल्याचे निरीक्षण त्वचारोग तज्ज्ञांनी नोंदविले.
शहरात थंडीचा कडाका कमी होऊन उन्हाचा चटका वाढत असल्याचे जाणवत आहे. ऋतू संक्रमणाचा हा काळ विषाणूजन्य रोगांच्या संसर्गासाठी पोषक ठरतो. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना संसर्गामुळे ऑनलाइन शाळा सुरू होत्या. त्यामुळे मुलांमध्ये दोन वर्षांमध्ये कांजण्यांच्या संसर्गाचे प्रमाण कमी दिसले. या वर्षी शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. त्याचा थेट परिणाम कांजण्यांच्या रुग्णांमध्ये वाढत होत असल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून एकेका दिवसाला पंधरा ते वीस रुग्णांना कांजण्यांचे निदान होत आहे. यापूर्वी हे प्रमाण अत्यल्प होते.
त्वचारोग तज्ज्ञ डॉ. धनश्री भिडे म्हणाल्या, ‘‘लहान मुलांबरोबरच काही प्रौढ रुग्णांमध्येही कांजण्यांचे निदान होत आहे. लहान मुलांमधील कांजण्यांमुळे इतर गुंतागुंत होण्याचा धोका कमी असतो. मात्र, मोठ्यांना झालेल्या कांजण्यांमुळे न्यूमोनियासारखे धोके वाढतात. विशेषतः गरोदरपणात कांजण्या होणार नाही, यासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. घरात कोणताही रुग्ण असेल तर त्याला स्वतंत्र खोलीत विलगीकरणात ठेवावे. त्याचा संपर्क गर्भवतीशी येणार नाही, याची प्रकर्षाने काळजी घेतली पाहिजे.’’

कांजण्यांचा संसर्ग
कंजण्या हा संसर्गजन्य आजार आहे. हर्पीस विषाणूंपासून त्याचा संसर्ग होतो. या वैद्यकीय परिभाषेत ‘व्हॅरिसेला झोस्टर व्हायरस’ (व्हीझेडव्ही) म्हणतात. संसर्ग झालेल्या रुग्णाच्या माध्यमातून हा विषाणू पसरतो. त्याचा संसर्ग झाल्यापासून दहा ते बारा दिवसांपर्यंत शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांपर्यंत पोचतो. श्वसननलीका, त्वचा यांचाही त्यात समावेश असतो. तोपर्यंत रुग्णाला विषाणूंच्या संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. संपूर्ण शरीरात पसरल्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये विषाणू संसर्गामुळे अंगदुखी सुरू होते. थकवा येतो. पुढील दोन ते तीन दिवसांनंतर शरीराच्या वेगवेगळ्या भागात फोड येतात. छाती, पाठ, पोट, चेहरा येथे लालसर फोड येणे कांजण्यांच्या संसर्गाचे प्रमुख लक्षण असते. रुग्णाच्या नाका-तोंडातील स्त्राव व श्लेष्म भागातील जखमा यापासून रोगाचा प्रसार होतो. शरीरावर खपली धरल्यानंतर रोगाचा प्रसार होत नाही, असेही डॉ. भिडे यांनी स्पष्ट केले.

लक्षणे काय?
- संपूर्ण शरीरावर पुरळ येतात.
- पुरळ आलेल्या जागी खाज सुटते
- डोळे, तोंड, डोळे, ओठ येथेही फोड येण्याची शक्यता
- जळजळ होणे
- भूक कमी होणे
- तोंडाला चव नसणे

रुग्णांनो ही काळजी घ्या
- शरीर स्वच्छ ठेवा
- वापणारे कपडे, अंथरूण इतरांपासून वेगळे ठेवा
- आठ दिवस घरातील स्वतंत्र खोलीत विलगिकरणात रहा
- पचायला हलके अन्न खा

धोका कोणता असतो?
कांजण्या आठ ते दहा दिवसांमध्ये बरा होणार आजार आहे. फोड आणि ताप हे यातील सर्वांत मोठे धोके आहेत. मात्र, प्रौढांमध्ये विशेषतः वेगवेगळ्या कारणांनी रोग प्रतिकारक शक्ती कमी झालेल्या रुग्णांमध्ये आणि गर्भवतींमध्ये याचा धोका सर्वाधिक असतो. अशा रुग्णांना न्यूमोनिया, मेंदूवर, पित्ताशयावर सूज येण्याची शक्यता असते.

सर्वाधिक काळजी कोणी घ्यावी
आतापर्यंत कांजण्या प्रतिबंधक लस न घेतलेल्या आणि कधीही याचा संसर्ग न झालेल्या नागरिकांनी सर्वाधिक काळजी घेतली पाहिजे.

कांजण्यांना रोखण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण उपयुक्त ठरते. पण, ज्यांनी लस घेतली नाही, किंवा ज्यांना आतापर्यंत कधीच कांजण्या झालेल्या नाहीत, अशांनी याची लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. वेळेच अचूक निदान आणि प्रभावी उपचार यातून कांजण्या पूर्ण बऱ्या होतात. काही रुग्णांमध्ये चेहऱ्यावर किंवा विविध अवयवांवर कांजण्यांच्या फोडाचे डाग राहतात. यावरही उपचार करून त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते.
- डॉ. स्वराज पोतदार, त्वचारोग तज्ज्ञ, संजीवन व्हिटालाइफ मेडिपॉइंट रुग्णालय
............