
सात मीटरच्या बसचा पर्याय खुला
पुणे, ता. १७ ः ‘पीएमपी’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत ३०० नवीन १२ मीटर लांबीच्या बस खरेदीचा निर्णय झाला असला तरी, सात मीटर लांबीच्या बस खरेदी संदर्भात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेशी चर्चा सुरू आहे, असे ‘पीएमपी’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. सात मीटर लांबीच्या बस खरेदीचा निर्णय रद्द झालेला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
''पीएमपी''च्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी झाली. यात कॅब सेवेचा निर्णय रद्द झाला. गर्दीच्या मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी २० इलेक्ट्रिक डबलडेकर बस घेण्याचा निर्णय झाला आहे. ‘पीएमपी’च्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या ३०० बसमुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. बससंख्या वाढल्याने प्रवासी संख्यादेखील वाढेल. परिणामी प्रवासी उत्पन्नात देखील वाढ होणार आहे, तसेच मेट्रोच्या कनेक्टिव्हीटीसाठी ७ मीटर लांबीच्या बसचाही पर्याय खुला ठेवण्यात आला आहे, असेही बकोरीया यांनी स्पष्ट केले.
---------