कर्ज काढून वारज्यात रुग्णालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्ज काढून वारज्यात रुग्णालय
कर्ज काढून वारज्यात रुग्णालय

कर्ज काढून वारज्यात रुग्णालय

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः वारजे येथे ३५० बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार असून, त्यासाठी पुणे महापालिका खासगी कंपनीला ३६० कोटी रुपयांचे कर्ज काढून देणार आहे. त्याबदल्यात पुणेकरांसाठी या रुग्णालयात १० टक्के मोफत बेड, ६ टक्के बेड हे केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या (सीजीएचएस) दरामध्ये उपलब्ध होणार आहेत. तर ८४ टक्के बेड संबंधित कंपनीला व्यावसायिक दराने वापरता येणार आहेत. शुक्रवारी या प्रस्तावास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
गेल्यावर्षी महापालिकेची मुदत संपण्याच्या पूर्वी फेब्रुवारी २०२२ मध्ये भाजपने वारजे येथे डिझाइन-बिल्ट-फायनान्स-ऑपरेट-ट्रान्स्फर (डीबीएफओटी) या तत्त्वावर रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. सरकारने कर्ज उभारणी मान्यता दिली, त्यानंतर याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पहिल्यांदा या निविदेत एकाच कंपनीने भाग घेतल्याने पुन्हा निविदेस मुदतवाढ दिली. त्यामध्ये रुरल एनहांसर्स आणि मे. ए. सी. शेख कॉन्ट्रॅक्टर या दोनच कंपन्या सहभागी झाल्या. यामध्ये रुरल एनहांसर्स या कंपनीचा प्रस्ताव महापालिकेच्या फायद्याचा असल्याने त्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पुढील ४५ दिवसांत या कंपनीने लेटर ऑफ इंटेट सादर केल्यानंतर कार्यआदेश दिले जाणार आहेत.

असे असेल रुग्णालय
- वारजे येथे सर्वे क्रमांक ७९/ब या येथे १० हजार चौरस फुटाची जागा उपलब्ध
- महापालिका नेदरलँडच्या बँकेकडून ३६० कोटीचे कर्ज घेणार
- रुग्णालय उभारल्यानंतर कर्जाचे हस्ते संबंधित संस्था फेडणार
- १० टक्के फ्री बेड, ६ टक्के बेड हे सीजीएचएस दरामध्ये उपलब्ध होतील. आजी-माजी नगरसेवकांना सीजीएचएस सुविधा असणार
- ८४ टक्के बेडवर ही कंपनी व्यावसायीक दराने उपचार करणार
- ही कंपनी महापालिकेला दरवर्षी ९० लाख रुपये भाडे देणार आहे. ३० वर्षांसाठीच्या करारात दरवर्षी ३ टक्के भाडेवाढ होणार
- नेदरलँडमधील इन्शुरन्स कंपनी या कर्जाचा विमा उतरवणार आहे. कर्जाचे हप्ते संबंधित संस्थेने भरायचे आहेत
- यासाठी महापालिका, निविदाधारक आणि कर्ज पुरवठा करणारी बँक यांच्यात त्रिसदस्यीय करार केला जाणार
- महापालिकेवर कुठलेच आर्थिक दायित्व नसणार

वारजे ३५० बेडचे रुग्णालय मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये दोन कंपन्या आल्या होत्या. त्यापैकी रुरल एनहांसर्स कंपनीचा प्रस्ताव मान्य केला आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कंपनीला रुग्णालय उभारण्याचे आदेश दिले जातील. यामध्ये मोफत बेड, सीजीएसए बेडचा नागरिकांना लाभ मिळतो की नाही यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाईल.
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका