कोरोना लाट पुन्हा येण्याची शक्यता कमीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना लाट पुन्हा येण्याची शक्यता कमीच
कोरोना लाट पुन्हा येण्याची शक्यता कमीच

कोरोना लाट पुन्हा येण्याची शक्यता कमीच

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेसारखा मोठा उद्रेक होण्याची शक्यता कमी असून, भविष्यात त्याच्या संसर्गाचे तुरळक रुग्ण आढळत राहतील. स्वाइन फ्ल्यूप्रमाणे कोरोना आता ‘एंडेमेक’ होत आहे. पण, त्याच्या संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना आवश्यक आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी दिली.

कोरोना आपल्याकडे एंडिमेक होताना दिसतो आहे. त्यामध्ये वातावरणातील बदलानुसार चढ-उतार होणार. तो पूर्णपणे नाहीसा अर्थातच होणार नाही पण सध्या ज्यारितीने आपल्याकडे स्वाईन फ्ल्यू वागतो आहे तसे त्याचे वागणे असेल, असे दिसते. २०२२ मध्ये मागील दोन वर्षे जवळपास गायब असणाऱ्या स्वाईन फ्ल्यू आजाराचे चार हजारांहून अधिक रुग्ण राज्यात आढळले आणि दोनशेहून अधिक मृत्यूदेखील झाले. याच प्रकारे कोरोनादेखील अधून-मधून डोकेवर काढत राहील आणि आपण अजून आहोत याची आठवण करून देत राहील. पण तो पॅंडेमिकमधील लाटेसारखा पुन्हा येईल, असे दिसत नाही, असे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
ते म्हणाले, “आता नैसर्गिक संसर्ग आणि लसीकरण या दोन्हीमुळे समाजाची हर्ड इम्युनिटी वाढलेली आहे. त्यामुळे पहिल्या किंवा दुसऱ्या लाटे इतक्या मोठया लाटा निकटच्या भविष्यात आपल्याकडे येणे शक्य वाटत नाही.”

चीनमध्ये आढळलेला ‘बीएफ.७’ हा देखील ओमायक्रॉनच आहे. शिवाय ‘बीएफ.७’ हा भारतात गुजरात, ओरिसासारख्या राज्यांत पूर्वी आढळलेला आहे तथापि तो इथे वाढलेला नाही. ज्या ‘बीक्यू.१’ सारख्या व्हेरियंटमुळे अमेरिकेत वाढ होते आहे तोही आपल्याकडे आढळलेला आहे. याशिवाय वेगवेगळ्या देशांमध्ये ‘एक्सबीबी’सारखे आढळणारे व्हेरियंटही आपल्याकडे आढळलेले आहेत. या पार्श्वभूमीवर जे विषाणू व्हेरियंट आपल्याकडे यापूर्वीच येऊन गेले आहेत त्यांच्यामुळे भारतात किंवा महाराष्ट्रात नवीन लाट येणे तर्काला फारसे पटणारे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवीन रुग्णांची संख्या घटली

जागतिक आरोग्य संघटनेच्या या आठवड्याच्या ताज्या जागतिक आकडेवारीनुसार कोरोनाच्या नवीन रुग्ण संख्येत २२ टक्क्यांनी घट झालेली आहे. या आजाराने होणाऱ्या मृत्यूंची संख्यादेखील १२ टक्क्यांनी कमी झाली आहे.

राज्यातील स्थिती काय?

डिसेंबर आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या पन्नासच्या आत आलेली आहे. प्रयोगशाळेचा शेकडा पॉझिटिव्हिटी दर ०.३ पर्यंत कमी झालेला आहे. संपूर्ण राज्यात दीडशे पेक्षाही कमी क्रियाशील रुग्ण आहेत. आठवड्यामध्ये रुग्णालयामध्ये भरती होणाऱ्या रुग्णाचे प्रमाण १५ ते १६ इतके कमी झालेले आहे. देश पातळीवरही कोरोना वेगाने कमी होताना दिसतो आहे. संपूर्ण जगात जे नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत, त्यात भारताचा वाटा अवघा ०.०३ टक्के एवढा कमी झालेला आहे.