पुण्यात किमान तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात किमान तापमानाचा
पारा वाढण्याची शक्यता
पुण्यात किमान तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता

पुण्यात किमान तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : गेल्या आठवडाभरात शहरात चार वेळा किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली नोंदला गेला. असे असले तरी शहरातील कमाल व किमान तापमानात मोठी तफावत झाली असून, रात्रीच्या वेळी गारठा तर दिवसा उन्हाच्या झळा कायम आहेत. शहरात पुढील दोन दिवसांनी किमान तापमानाचा पारादेखील वाढण्याची शक्‍यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

रविवारी (ता. १९) शहरात ३३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान तर ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, किमान तापमानात सरासरीपेक्षा २ अंशांनी घट कायम आहे. मात्र दिवसाच्या तापमानात वाढ होत असल्याने उकाडा जाणवत आहे. एकीकडे शहरातील किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ तर दुसरीकडे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट कायम आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. पुढील दोन दिवस शहरात अशीच स्थिती कायम राहू शकते. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपासून (ता. २२) कमाल व किमान तापमानात वाढ होणार असून, शहर आणि परिसरातील किमान तापमान १५ ते २३ अंशांच्या घरात पोचण्याचा अंदाज आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फेब्रुवारी उष्ण
हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार १ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फेब्रुवारी महिना अधिक उष्ण ठरला आहे. सध्या राजस्थान गुजरातला लागून असलेल्या ईशान्य अरबी समुद्रावरील विरोधी चक्रावाताच्या (अँटीसायक्लोनिक) प्रभावामुळे पुणे व परिसरावर पूर्वेचे वारे वाहत आहेत. परिणामी, शहरात कमाल तापमानात चांगलीच वाढ होत असून, यंदा फेब्रुवारी महिना (१ ते १९ फेब्रुवारीपर्यंत) गेल्या वर्षीच्या तुलनेपेक्षा १.६४ अंश सेल्सिअस अधिक उष्ण ठरला आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी शास्त्रज्ञ व टायफून रिसर्च सेंटर येथे कार्यरत असलेल्या विनीतकुमार यांनी दिली.

मागील सहा दिवसांतील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
तारीख कमाल तापमान किमान तापमान
१४ फेब्रुवारी ३२.३ १०.६
१५ फेब्रुवारी ३४.१ ८.४
१६ फेब्रुवारी ३४.३ ९.४
१७ फेब्रुवारी ३४.७ १०.८
१८ फेब्रुवारी ३४.५ ९.९
१९ फेब्रुवारी ३३.७ ९.४