
‘सीएनजी’च्या टाक्यांची तपासणी महागल्याने रिक्षाचालक हैराण
पुणे, ता. १६ ः पुणे व चिंचवड शहरात सीएनजी टाक्यांच्या तपासणीच्या दरात तब्बल पाचपटीने वाढ झाली आहे. रिक्षाच्या सीएनजी टाकीच्या तपासणीसाठी (टेस्टिंग) पूर्वी चारशे ते सहाशे रुपयांचा खर्च होता. आता त्यात वाढ होऊन चाचणीचा खर्च सुमारे २५०० रुपये इतका झाला आहे. पुणे व चिंचवड येथील केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या टेस्टिंग करणाऱ्या सुमारे २५ संस्थांनी अचानक ही वाढ केल्याने रिक्षा व कॅबचालकांचे आर्थिक नुकसान होत आहे, अशी माहिती शिवनेरी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोक सालेकर यांनी दिली.
सालेकर पुढे म्हणाले की मोटार वाहन कायद्यानुसार सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांच्या टाक्यांची दर तीन वर्षांनी तपासणी करून घेणे अनिवार्य आहे. पुण्यात सुमारे ९० हजार रिक्षा असून, त्या सर्व सीएनजीवर धावतात. ज्या रिक्षांतील सीएनजीची टाकी बसवून तीन वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांना आता पुन्हा एकदा तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र वाढलेल्या दरांमुळे अनेक रिक्षाचालक अशी तपासणी करणे टाळतात. मात्र यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवडमधून रिक्षाने होणारी प्रवासी वाहतूक धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर केंद्रावर आरटीओ व वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणीदेखील सालेकर यांनी या वेळी केली आहे. अध्यक्ष आबा बाबर, रिक्षा फेडरेशनचे बापू भावे आदी उपस्थित होते.