
साखळी ओढल्याने ४७ रेल्वेंना फटका
पुणे, ता. २१ ः पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांना ‘एसीपी’चा (अलार्म चैन पुलिंग) फटका बसत आहे. शुल्लक कारणांसाठी प्रवासी फलाटावरून गाडी निघाल्यावर डब्यातील साखळी ओढून रेल्वे थांबवीत आहे. त्यामुळे गाड्यांना फटका बसत आहे. प्रवासी रेल्वे गाड्यांना उशीर होत आहे. त्यामुळे याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे.
नेमके काय होते?
- पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांबाबत हा प्रकार घडत आहे.
- एकदा साखळी ओढली तर एका रेल्वेला किमान ८ ते १० मिनिटांचा उशीर होतो.
- एका रेल्वेला उशीर झाला तर त्याच्या पाठीमागे येणाऱ्या आणखी रेल्वेला देखील त्याचा फटका बसतो.
- आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांची गस्त असली तरी प्रवासी त्यांना न जुमानता साखळी ओढून रेल्वे थांबवीत आहे. - मागील २० दिवसांत साखळी ओढण्याच्या सुमारे ४२ घटना घडल्या आहेत.
- याचा थेट फटका ४७ प्रवासी गाड्यांना बसला आहे.
प्रवासी काय सांगतात कारणे?
प्रवाशांनी डब्यातील साखळी ओढल्यावर रेल्वे थांबते. जर त्यावेळी फलाटावर आरपीएफ असेल तर तो संबंधित डब्यात जाऊन साखळी ओढलेल्या प्रवाशाचा शोध घेतो. प्रवासी सापडल्यास त्याला ताब्यात घेतले जाते. यावेळी तो विविध कारणे सांगतो. यात ते म्हणतात, प्रवासी खाली राहिला, सामान फलाटावर विसरले, मोबाईल खाली पडला. मात्र, हे सर्व गैरलागू असल्याने आरपीएफ त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत आहे.