कपड्यांची डिझाइन चुकविणे पडले महागात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कपड्यांची डिझाइन चुकविणे पडले महागात
कपड्यांची डिझाइन चुकविणे पडले महागात

कपड्यांची डिझाइन चुकविणे पडले महागात

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : लग्नासह विविध कार्यक्रमांमध्ये परिधान करण्यासाठी दिलेल्या महागड्या साड्यांच्या ब्लाउजची डिझाइन चुकविणे एका महिला डिझायनरला चांगलेच महागात पडले आहे. ब्लाउजची चुकलेली डिझाइन दुरुस्त करण्यासाठी व ब्लाउजमध्ये आवश्‍यक ते बदल करण्यासाठी या महिला डिझायनरने ग्राहक महिलेला १० हजार रुपये नुकसान भरपाई दिली. त्यामुळे ग्राहक आयोगात दाखल होण्यापूर्वीच हे प्रकरण निकाली निघाले.
ग्राहकाने नोटिस पाठवत याबाबत जाब विचारत नुकसान भरपाईची मागणी केल्याने डिझायनरने आपली चूक मान्य करत ग्राहकाला नुकसान भरपाई दिली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, व्यावसायिक असलेल्या रेश्‍मा (नाव बदललेले) यांनी बी. टी. कवडे रस्त्यावर असलेल्या एका डिझायनर महिलेकडे ११ ब्लाऊज शिवण्यासाठी दिले होते. त्यासाठी सात हजार रुपये शिलाई ठरली होती. ते कसे शिवायचे आहेत, याबाबतची माहिती आणि फोटो रेश्‍मा यांनी डिझायनरला दिले होते. त्यानंतर वारंवार आठवण करून दिल्यानंतर तिने रेश्‍मा यांना ब्लाउजच्या ट्रायलसाठी बोलावले. रेश्‍मा यांनी ते ब्लाउज त्यांना बरोबर बसत नसल्याचे व फोटो दिलेल्या डिझाइनप्रमाणे नसल्याचे सांगितले. त्यानंतर अनेकदा आठवण करूनही डिझायनरने वेळेत ब्लाउज दिले नाहीत. शेवटी १० डिसेंबर २०२२ रोजी रेश्‍मा यांना त्यांचे १० ब्लाऊज मिळाले. मात्र त्याची फिटिंग आणि डिझायनिंग चुकली असल्याचे त्यांना लक्षात आले. त्यामुळे त्यांनी त्यात दुरुस्ती करून देण्याचे डिझायनरला सांगितले, तर एका ब्लाउजची शिलाई पूर्ण चुकल्याने तो रेश्‍मा यांनी स्वीकारलाच नाही. रेश्‍मा यांनी पुन्हा काही दिवसांनी डिझायनरच्या शोरूमला भेट देत दुरुस्त केलेले ब्लाउज आणि त्याचा उरलेला कपडा देण्याची मागणी केली. मात्र काही दिवसांनी डिझायनरने रेश्‍मा यांचे फोन घेणे टाळले व त्यानंतर स्पष्ट केले की, मी काही बदल करून देऊ शकत नाही. येऊन तुझे ब्लाऊज घेऊन जा व तुझे तू बग. डिझायनरने हात वर केल्याने रेश्‍मा यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे ग्राहक महिलेने ॲड. सृष्टी अहीर आणि ॲड. प्रियांका सोमवंशी यांच्यामार्फत डिझायनर महिलेला नोटीस बजावली होती.