मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाण घटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाण घटले
मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाण घटले

मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाण घटले

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २१ : वीज ग्राहकांना अचूक वीजबिले मिळावीत, यासाठी महावितरणने चालविलेल्या मोहिमेला यश येत असून गेल्या सहा महिन्यांत विजेच्या मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाण पुण्यासह राज्यात दोन टक्क्यांपेक्षाही कमी झाले आहे. जानेवारीत ते दीड टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. परिणामी, ग्राहकांच्या वीजबिलांविषयीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

महावितरणकडून ग्राहकांच्या वीज मीटरचे फोटो काढले जातात. त्यांच्या आधारे वीजवापराच्या आकडेवारीची नोंद घेऊन ग्राहकांना विजेची बिले दिली जातात. मीटर सदोष असेल किंवा बंद असेल, घराला कुलुप असले, तर मीटर रिडिंग करता येत नाही. मीटरचे पॅनेल स्पष्ट दिसत नसेल किंवा मीटरचा फोटो अस्पष्ट असेल तर सरासरी वीजबिले दिली जातात. त्यामुळे ग्राहकांचे नुकसान होत असून महावितरणचाही महसूल बुडतो. वीज वापराइतकी अचूक बिले दिली गेली, तर त्यांच्या तक्रारी कमी होतात. तसेच महावितरणच्या महसुलातही वाढ होते. मीटरचे फोटो स्पष्ट असावेत व वीजवापराचे आकडे अचूक नोंदविले जावेत, यासाठी महावितरणने मोहीम राबवली होती. त्यामुळे एके काळी ४६ टक्क्यांवर असलेले मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाण खूप कमी झाले. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हे प्रमाण २.३ टक्के होते. त्यानंतर हे प्रमाण आणखी कमी होऊन जानेवारीत केवळ दीड टक्का झाले.

दृष्टिक्षेपात -
- राज्यात सामान्य वीजबिलांचे प्रमाण ८९.८ टक्के
-कल्याण परिमंडळात हे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ९६.४ टक्के
- नागपूर, कोल्हापूर, भांडूप परिमंडलाना सामान्य बिलांच्या बाबतीत ९५ टक्क्यांचा टप्पा ओलांडण्यात यश
- पुणे, गोंदिया परिमंडलांत सामान्य बिलांचे प्रमाण ९४ टक्क्यांवर

राज्यात अस्पष्ट फोटोंचे प्रमाण दीड टक्के
मीटरच्या अस्पष्ट फोटोंच्या बाबतीतही कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, कोकण, कल्याण व भांडूप या परिमंडलातील प्रमाण प्रत्येकी एक टक्क्यांच्याही खाली गेले आहे. तर पुणे, बारामती, अमरावती, जळगाव व नांदेड या परिमंडलांमध्ये वीज मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाणे एक ते दोन टक्के आहे. राज्यातील हे एकूण प्रमाण जानेवारीत दीड टक्के होते.