
विश्वकर्मा अभियांत्रिकीत ‘उत्कर्ष’चे आयोजन
पुणे, ता. २२ ः विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सामाजिक विकास व कल्याण समितीतर्फे ‘उत्कर्ष’ या सामाजिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. समाजातील वंचित घटकांसाठी २७ जानेवारीपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. २३३ स्वयंसेवकांद्वारे शालेय विद्यार्थ्यांना जीवनातील तंत्रज्ञान, विविध खेळ, सामान्य ज्ञान, संभाषण कौशल्ये तसेच कलेचे महत्त्व अशा अनेक गोष्टींबाबत आनंददायी शिक्षण देण्यात येत आहे. आजवर पाच शाळांमधील ४५९ विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आहे.
पुढील एक महिना हे काम कमिटीचे विद्यार्थी प्रतिनिधी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या समन्वयकांद्वारे सुरू राहणार आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन करण्यात येत आहे. या वेळी विद्यार्थ्यांनी लॅपटॉप हाताळण्याचा व त्यातील मूलभूत गोष्टी जाणून घेण्याचा अनुभव घेतला. शालेय अभ्यासक्रमातील विविध गोष्टी लॅपटॉपवर व त्यासंबंधीचे व्हिडिओ बघून विद्यार्थ्यांनी विषय समजून घेतला. इंग्रजी भाषेत संभाषण करण्याचे कौशल्यदेखील विद्यार्थी जोपासत आहेत.