काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या 
मनसेच्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी
काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी

काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला पाठिंबा दिलेला असला तरी प्रचार करू नये, असे आदेश दिले होते. पण आता प्रचार शेवटच्या टप्प्यात आलेला असताना भाजपचे मतदान वाढेल यादृष्टीने अप्रत्यक्ष मदत करण्याचा निर्णय कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या सात मनसे कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

मनसेच्या कोअर कमिटीची बैठक आज पुण्यामध्ये झाली. त्यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, हेमंत संभूस, अजय शिंदे, गणेश सातपुते, योगेश खैरे, रणजित शिरोळे, बाळा शेडगे, साईनाथ बाबर आदी उपस्थित होते. बैठकीत भाजपला मदत करण्याच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. त्यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना थेट प्रचार करता येणार नाही, पण वैयक्तिक पातळीवर, भाजपला मदत होईल यासाठी अप्रत्यक्षपणे प्रचार करता येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सरचिटणीस हेमंत संभूस म्हणाले, ‘‘पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा देताना कार्यकर्त्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेऊ नये असे आदेश दिले होते. पण या निवडणुकीत भाजपचे मतदान वाढेल यादृष्टीने प्रयत्न करावेत असा निर्णय घेण्यात आला आहे.’’ शहराध्यक्ष बाबर म्हणाले, या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल बांदांगे, रिझवान मिरजकर, प्रकाश ढमढेरे, नीलेश कदम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.