गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

फर्ग्युसन रस्त्यावर दुकानांतील कामगारांमध्ये मारहाण

पुणे, ता. २२ : दुकानात येणाऱ्या ग्राहकांवरून वाद घालत दोन दुकानांमधील कामगारांनी एकमेकांना मारहाण केल्याची घटना नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन रस्ता) केसरिया लेन येथे घडली. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे. याबाबत पोलिस नाईक तुषार आल्हाट यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून डेक्कन पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महेश मारुती नायक (वय २४, रा. वारजे), सूरज श्रीकांत कालगुडे (वय २१, रा. जनवाडी), अमित नीलेश देशपांडे (वय २६, रा. नारायण पेठ) आणि विशाल नरेश उकिरडे (वय २१, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
------
आदिनाथ सोसायटीमधील ज्येष्ठाच्या कारमधून रोकड लंपास
पुणे : आदिनाथ सोसायटीमधील एका ज्येष्ठ नागरिकाच्या कारमधून चोरट्यांनी २५ हजारांची रोकड आणि कागदपत्रे लंपास केली. ही घटना स्वारगेट परिसरातील दादावाडी जैन मंदिरासमोर सोमवारी सायंकाळी घडली. फिर्यादी (वय ६३, रा. आदिनाथ सोसायटी, सातारा रस्ता) यांनी त्यांची कार मंदिरासमोर पार्क केली होती. चोरट्यांनी कारची मागील बाजूची काच फोडून सुटकेसमधील रोख २५ हजार रुपये आणि कागदपत्रे चोरून नेले. याबाबत स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----
चिकन राइस उधार न दिल्यामुळे हॉटेलचालकावर वार
पुणे : चिकन राइस उधार न दिल्याच्या कारणावरून टोळक्याने चायनीज हॉटेल चालविणाऱ्या व्यक्तीवर हत्याराने वार करून जखमी केले. ही घटना भवानी पेठेतील चुडामण तालीम चौकात मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी हॉटेलचालकाने फिर्याद दिली आहे. त्यावरून खडक पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींपैकी एकाने हॉटेलचालकास उधार चिकन राइस मागितले, परंतु उधार देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने त्याच्या इतर सहा साथीदारांना बोलावून बांबूने हॉटेलच्या काचा फोडून साहित्य फेकून दिले. फिर्यादीच्या दोन्ही हातांवर हत्याराने वार केले. तसेच, ड्रावरमधून दहा हजार रुपये चोरी केले.
-------
सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्यास अटक
पुणे : बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेलेल्या जोडप्याला लुबाडून सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्याला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले, तर त्याच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
शाहरुख ऊर्फ सुस्ताड शकील अन्सारी (वय २०, सय्यदनगर, हडपसर) असे
अटक केलेल्याचे नाव आहे. बोपदेव घाटात १२ फेब्रुवारी रोजी दुपारी दुचाकीवर आलेल्या दोघांनी जोडप्याला अडवून सोनसाखळी हिसकावून नेली होती. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून आरोपीचा शोध घेतला. कडनगर भागात आरोपी आढळून आल्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याला जेरबंद केले.
------
बालसुधारगृहातून पलायन केलेला मुलगा ताब्यात
पुणे : येरवडा येथील बालसुधार गृहातून पलायन केलेल्यांपैकी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. बाल सुधारगृहातून २० जानेवारी रोजी आठ अल्पवयीन मुलांनी भिंतीला शिडी लावून पलायन केले होते.
त्यापैकी एक अल्पवयीन मुलगा परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असून, तो पुणे रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. या अल्पवयीन मुलाविरुद्ध लोणावळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.
-------