सामान्य खेळाडू सुविधांपासून वंचित ः शरद पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामान्य खेळाडू सुविधांपासून वंचित ः शरद पवार
सामान्य खेळाडू सुविधांपासून वंचित ः शरद पवार

सामान्य खेळाडू सुविधांपासून वंचित ः शरद पवार

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः राज्यातील विविध खेळातील सर्वसामान्य खेळाडूंना आपापल्या खेळासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने म्हाळुंगे-बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा संकुल उभारण्यात आले. कालांतराने या संकुलात (स्टेडियम) अर्थकारण शिरले. याचा परिणाम हा सर्वसामान्य खेळाडू हे या सुविधांपासून वंचित राहण्यात झाला असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.

कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार (महाविकास आघाडी) रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ खेळाडूंचा मेळावा आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पवार बोलत होते. या वेळी उमेदवार रवींद्र धंगेकर, खासदार वंदना चव्हाण, अभय छाजेड, रोहित टिळक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीपक मानकर, काका पवार आदींसह शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू, मार्गदर्शक आणि राष्‍ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते. पवार पुढे म्हणाले, ‘‘बालेवाडीमध्ये १९९४ साली शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या उभारणीची मुहूर्तमेढ रोवली. एवढे भव्यदिव्य क्रीडा संकुल असूनही सर्वसामान्य घरातील खेळाडूंना सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. खेळाडूंच्या अडचणी सोडविण्यासाठी मी नेहमीच तयार आहे.’’ या वेळी कबड्डीपटू वासंती बोर्डे-सातव, रोलर स्केटिंगपटू वैदेही सरोदे, मल्लखांबपटू सत्यजित शिंदे, अर्जुनवीर पुरस्कारविजेते शांताराम जाधव, श्रीरंग इनामदार यांनी खेळांडूंच्यावतीने प्रतिनिधीक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. शिल्पा भोसले यांनी सूत्रसंचालन केले. शांतिलाल सुरतवाला यांनी आभार मानले.