
आयोगाचा निर्णय मेरीटवरच : मुख्यमंत्री पुण्यात टिळक कुटुंबीयांची घेतली भेट
पुणे, ता. २३ : लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असते. भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून स्थापन झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘मेरीट’वर निर्णय दिला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सांगितले.
कसबा पोटनिवडणुकीनिमित्त शिंदे पुण्यात आले होते. या वेळी त्यांनी टिळक कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच, गणपती मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी मंत्री गिरीश महाजन, शैलेश टिळक, कुणाल टिळक उपस्थित होते. सरकारकडून यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्यातील एका कार्यक्रमात केला होता, त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी हे उत्तर दिले.
‘‘शिवसेना पक्ष कार्यालयाला भेट देण्यासाठी मी पुण्यात आलो होतो. कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे युतीचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘दिवंगत आमदार मुक्ता टिळक आजारी असताना मी गेलो होतो. या वेळी त्यांनी जुन्या वाड्यांचा पुनर्विकास आणि धोकादायक इमारतींसंदर्भात निवेदन दिले होते. सरकारने हा विषय प्राधान्याने सोडविण्याचा निर्णय घेतला आहे. पुनर्विकासाचा प्रश्न येत्या काही काळात सोडवला जाईल. यासाठी नियमात काही बदल करावे लागतील. याबाबत सरकार सकारात्मक आहे.’’
गणेश मंडळांसोबत झालेल्या बैठकीबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘गणपती मंडळांच्या काही प्रश्नांबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. मुक्ता टिळक यांनी गणेशोत्सवाच्या संग्रहालयाची संकल्पना मांडली होती. यासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकार लवकरच याबाबत निर्णय घेईल.’’