माझ्या लढाईला नवीन साथीदार द्या ः आदित्य ठाकरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माझ्या लढाईला नवीन साथीदार द्या ः आदित्य ठाकरे
माझ्या लढाईला नवीन साथीदार द्या ः आदित्य ठाकरे

माझ्या लढाईला नवीन साथीदार द्या ः आदित्य ठाकरे

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः ‘‘जाती-जातीमध्ये, धर्मा-धर्मामध्ये वाद निर्माण केले जातील, अफवा पसरविल्या जातील; मात्र गद्दारांच्या अशा प्रयत्नांना तुम्ही बळी पडणार का?’’ असा सवाल करत ‘माझ्या या लढाईला तुम्ही एक नवीन साथीदार द्या. आपल्याला जिंकायचे आहे, महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे,’’ असे आवाहन शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी केले.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी ठाकरे यांनी रॅली काढली. नाना पेठेतील साखळीपीर तालीम येथे रॅलीचा समारोप झाला. या वेळी झालेल्या सभेत ठाकरे यांनी हे आवाहन केले. खासदार श्रीनिवास पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सचिन अहिर, सुनील केदार, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, काँग्रसचे गटनेते अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित होते. केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर ठाकरी भाषेत टीका करतानाच सभेला जमलेल्या गर्दीतून ‘५० खोके एकदम ओके’ अशी जोरदार घोषणाबाजी झाली. ‘हिंमत असेल तर, महापालिका निवडणुका लावून दाखवा’ असे आव्हानही त्यांनी या वेळी दिले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल, तेव्हा हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारचं, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
‘स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके’, अशी मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांवर टीका करीत ठाकरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात अतिशय घाणेरडे राजकारण सुरू आहे. शिवसेनेचे नाव, चिन्ह चोरले. याच ४० लोकांनी शिवसेनेशी गद्दारी केली, म्हणून त्यांना त्यांची जागा दाखविण्यासाठी ही निवडणूक जगावेळी आहे. केवळ विदर्भ, मराठवाडा, मुंबईच नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.’’

गृहीत धरणाऱ्यांना गाडून टाका ः उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी दृकश्राव्य पद्धतीने उपस्थितांशी संवाद साधला. ‘‘शिवसेनेचे नाव, चिन्ह चोरले. पक्षामध्ये फूट पाडली. लोकमान्य टिळकांच्या कुटुंबीयांवर अन्याय केला, आजारी गिरीश बापट यांना प्रचारात उतरविले, एवढेच नव्हे, तर आमच्या ॲड. सचिन भोसलेंवर हल्ला केला. राजकारणातील अशा पाशवी वृत्तीला खाली उतरवा. गृहीत धरून राजकारण करणार असतील, तर त्यांचे राजकारण गाडून टाका. मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्‍यता आहे, देशाला हुकूमशाहीतून वाचविण्यासाठी चिंचवडला नाना काटे यांना, कसब्यात रवींद्र धंगेकर यांना विजयी करा,’’ असे आवाहनही त्यांनी केले.

ठाकरे उवाच
- माझे रक्त पुण्याचेच, बाळासाहेब ठाकरेंचा जन्म पुण्यातला
- पुणेकरांकडून मी प्रेरणा घेऊन जातोय
- हरण्याच्या भीतीपोटी मुंबई, पुणे महापालिका निवडणूक लावण्याची हिंमत नाही
- रिव्हर डेव्हलपमेंटमुळे ५ वर्षांत पुराचा धोका
- सालीम अली पक्षी अभयारण्य ‘डंपिंग ग्राउंड’ केले
- शिवसैनिकच नव्हे, सर्वसामान्य नागरिकांच्या मागे ईडी, सीबीआय
- सत्याची बाजू मांडणाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा
- संविधानाच्या, लोकशाहीसाठी ही लढाई
- महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला हलविले
़ २६६७७