
कसब्यात निवडणुकीसाठी चोख बंदोबस्त
पुणे, ता. २४ : कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी कसबा मतदारसंघात १७०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात असेल. मतदारसंघात शहर पोलिस दलाकडून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त आर. राजा या वेळी उपस्थित होते.
कसबा मतदारसंघात शनिवारपासून (ता. २५) चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी शहर पोलिस दलातील ११०० पोलिस अधिकारी-कर्मचारी, केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) ५०० जवान आणि राज्य राखीव पोलिस दलातील १०० पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असतील. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात राहणार आहेत. फरासखाना, विश्रामबाग, समर्थ, खडक आणि दत्तवाडी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीत नऊ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. त्याठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येईल. मतदान केंद्रांपासून शंभर मीटर अंतरातील सर्व दुकाने, उपाहारगृहे, खाद्यपदार्थ गाड्या, टपऱ्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कसब्यात ३२ लाख १८ हजार रुपये जप्त
कसबा पोटनिवडणुकीदरम्यान पोलिसांनी १३ हजार ५४२ वाहनांची तपासणी केली. भरारी पथकांनी नाकाबंदीत ३२ लाख १८ हजार रुपये जप्त केले आहेत. ही रक्कम निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन हजार ७८९ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांकडून ११९ शस्त्रे जप्त केली. तसेच, पोलिसांनी ३३ हजार ७८५ रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आल्याचे आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.