
ससून रुग्णालयात दोन टोळा एकमेकांमध्ये भिडल्या; कोयत्याने वार
पुणे, ता. २४ : हडपसर भागातील दोन टोळ्यांमधील गुन्हेगारांनी एकमेकांवर कोयत्याने केलेल्या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले आहेत. ससून रुग्णालयाच्या आवारात शुक्रवारी झालेल्या या घटनेमुळे रुग्ण आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली. हा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
हडपसर येथील रामटेकडी परिसरातील दोन गुन्हेगारी टोळ्यांमध्ये शुक्रवारी दुपारी वाद झाला होता. हडपसर पोलिसांनी या दोन्ही टोळ्यांमधील गुन्हेगारांवर कारवाई केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात आणले. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण उपचार कक्षाबाहेर दोन टोळ्यांमधील गुन्हेगार समोरासमोर आले. त्यावेळी गुन्हेगारांसोबत असलेले त्यांचे साथीदार एकमेकांशी भिडले. त्यांनी शिवीगाळ करीत एकमेकांवर कोयत्याने वार केले. त्यात तिघेजण जखमी झाले आहेत. ससून रुग्णालयाचे सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी गुन्हेगारांना रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोन्ही टोळ्यांमधील गुन्हेगारांना अटक केली आहे.