मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः प्रसिद्ध साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध संस्था, संघटनांनी सोमवारी (ता. २७) नाट्यप्रयोग, स्वाक्षरी मोहीम या उपक्रमांमार्फत हा दिवस साजरा करण्याची आखणी केली आहे.

‘अक्षरधारा बुक गॅलरी’ आणि ‘शब्दमानसी’ यांच्यातर्फे कुसुमाग्रजांच्या कविता, कथा आणि गीतांवर आधारित ‘रसयात्रा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची संकल्पना मानसी आपटे यांची असून आदित्य नांदे, स्वाती फडके, अभिजित नांदगावकर, मीनल जोशी आणि मानसी आपटे हे कलाकार हा कार्यक्रम सादर करणार आहेत. सोमवारी (ता. २७) सायंकाळी ६.३० वाजता बाजीराव रस्त्यावरील अक्षरधारा बुक गॅलरीच्या कुसुमाग्रज वाचक कट्टा येथे हा कार्यक्रम होणार आहे.
जागतिक मराठी अकादमीतर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी ५ वाजता विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते गोव्याचे कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे प्रमुख पाहुणे म्हणून आणि डॉ. डी. वा. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी सिद्धीनंदन थिएटर, गोवा यांच्यातर्फे प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकाचा प्रयोग सादर केला जाईल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या दिनानिमित्त ‘मी मराठी... स्वाक्षरी मराठी’ ही मोहीम राबवली जाणार आहे. टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाजवळ सकाळी १० ते २ या वेळेत भव्य फलकावर नागरिकांना मराठीमध्ये स्वाक्षरी करण्यासाठी आवाहन केले जाईल. या उपक्रमाचे यंदा १४ वे वर्ष आहे.