‘अविवेकी विचारांशी लढण्यासाठी संवाद गरजेचा’
पुणे, ता. २६ ः ‘‘अंधश्रद्धा पसरवणारे लोक खलनायक असले तरी अंधश्रद्धाळू लोक हे त्याचे बळी आहेत. या लोकांशी आपण बंधुता आणि करुणेने संवाद साधून अविवेकी विचाराशी लढले पाहिजे’’, असे मत माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी रविवारी व्यक्त केले.
फ्रेंड्स ऑफ दाभोलकर व परिवर्तन संस्था निर्मित आणि जे. जे. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या ‘कसोटी विवेकाची’ या नरेंद्र दाभोलकर चित्र, शिल्प, कला प्रदर्शनाचे आयोजन ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुणे जिल्हा’ यांनी केले. या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात देशमुख बोलत होते. याप्रसंगी अंनिसच्या महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष आणि सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर, ‘अंनिस’चे राज्य कार्यकारी समिती सदस्य श्रीपाल ललवाणी, ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ, फ्रेंड्स ऑफ दाभोलकर गटाच्या प्रतिनिधी विद्या कुलकर्णी आदी उपस्थित होते.
‘अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार पोहोचवण्यासाठी सातत्याने काम करणे गरजेचे आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ते काम होत आहे. प्रदर्शनाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता महाराष्ट्रभरात हे प्रदर्शन आयोजित केले पाहिजे’, असे प्रतापराव पवार यांनी सांगितले. ‘डॉ. दाभोलकरांच्या खुनाची घटना आणि त्यामागचा राजकीय विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे कला प्रदर्शन तयार करण्याची कल्पना पुढे आली. मुंबई, कोल्हापूर, सांगली इथे या प्रदर्शनाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. यानंतर नाशिक व औरंगाबाद येथे हे प्रदर्शन होणार आहे’, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
गुरुवारपर्यंत प्रदर्शन खुले
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विचार, त्यांचे जीवनकार्य, त्यांचा खून आणि त्यानंतरचा घटनाक्रम आदी बाबी या प्रदर्शनात विविध कलाकृतींच्या माध्यमातून पाहायला मिळतील. गुरुवारपर्यंत (ता. २) सकाळी १० ते रात्री ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. मंगळवारी (ता. २८) सायंकाळी ५.३० वाजता एमकेसीएलचे प्रमुख मार्गदर्शक विवेक सावंत यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन आणि ‘विज्ञानाने मला काय दिले’ या विषयावर व्याख्यान, बुधवारी (ता. १) सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्याशी संवाद आणि गुरुवारी (ता. २) सकाळी ११ वाजता प्रसिद्ध चित्रकार राजू पवार आणि गणेश विसपुते यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचा समारोप होईल.