‘युवक’केंद्रीत निवडणुकीसाठी आमचे मतदान महत्त्वाचे नवमतदारांच्या भावना; तंत्रज्ञानामुळे प्रक्रिया सुलभ झाल्याचे मत
पुणे, ता. २६ : निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित घटकांपासून करदात्यांपर्यंत सर्वच घटकांचा विचार केला जातो. मात्र, काही अंशी युवकांच्या प्रश्नांना बगल दिल्याचे पाहायला मिळते. राजकारण्यांच्या जाहीरनाम्यात युवककेंद्रीत धोरणे असावेत, म्हणून आम्ही मतदानासाठी आग्रहाने बाहेर पडतो, असे मत गुरुवार पेठेतील आदित्य कुंडुरकर याने व्यक्त केले. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने त्याला प्रथमच मतदानाचा हक्क बजावण्यास मिळाला आहे.
कसब्यातील बहुतेक मतदान केंद्रांवरील नवमतदारांनी तंत्रज्ञानाचा कुशलतेने वापर केल्याचे चित्र पाहायला मिळाले. मतदानाचे केंद्र, बूथ आणि मतदारयादी क्रमांक व्हॉट्सॲपवरच प्राप्त केले होते. त्यामुळे मतदान केंद्रावर गेल्यावर विनाविलंब मतदानासाठी उभे राहता आले. पहिलेच मतदान असल्याने उत्सुकता आणि भीती अशी संमिश्र भावना जवळपास सर्वच मतदारांनी व्यक्त केली. आदित्य म्हणतो, ‘‘घरच्यांकडून तसेच मित्रांकडून मतदान करण्याची प्रक्रिया माहीत झाली होती. त्यामुळे फार अडचण आली नाही. देशातील लोकशाहीसाठी मतदान हे आपले कर्तव्य असून आपण ते बजावले पाहिजे.’’ सदाशिव पेठेतील प्राजक्ता देशमुख सांगतात, ‘‘विधानसभेसाठी माझे हे पहिलेच मतदान होते. खरेतर प्रत्येक पिढीतील नवयुवकांनी मतदानासाठी पुढे येत एक आदर्श निर्माण केला आहे. एक युवक म्हणून आपल्या अपेक्षांना धोरणात्मक बाबींत उतरविण्यासाठी नेता महत्त्वाचा असून, मतदानाद्वारे आपण योग्य नेत्याची निवड करतो.’’ अचानक किंवा अनपेक्षित पद्धतीने पोटनिवडणूक लागली असली तरी, आपले प्रतिनिधित्व विधिमंडळात असणे गरजेचे असल्याची भावनाही युवकांनी व्यक्त केली.
आपल्या आवडत्या नेत्याला निवडून देण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. खरेतर आपल्या मताला एवढे महत्त्व प्राप्त होणे, माझ्यासाठी नक्कीच महत्त्वाचे आहे. लोकशाहीसाठी मतदान करणे आपले प्रथम कर्तव्य आहे.
- विश्वेश झाड, कसबा
मतदान करणे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे ते बजावायलाच हवेच. निश्चितच प्रथमच मतदान करत असल्यामुळे एक कुतूहल होते. घरच्यांच्या मदतीने सर्व प्रक्रियांची माहिती घेत, मी मतदान केले.
- सुखमित कौर भोलासिंग अरोरा, नाना पेठ
फोटो ः 27244, 27246, 27247, 27251
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.